तळोदा येथे पीक कर्ज अभियानांंतर्गत कृषीकर्ज मेळावा

0
तळोदा । दि.22 । श.प्र.-शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबुन आहे, यासाठी निसर्गाचा समतोल राखणे देखील महत्वाचे आहे.
यासाठी शासन जलयुक्त शिवार योजनादेखील राबवित असुन शेतकर्‍यांना शाश्वतशेतीसाठी लागणारा अर्थपुरवठा नियमीत व पुरेसा विजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन आ.उदेसिंग पाडवी यांनी सुलभ पिककर्ज अभियान 2017 अतर्गत कृषीकर्ज मेळावा मध्ये बोलतांना केले.
आ.पाडवी म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच अवकाळी पाऊस, गारपीट आदी संकटामुळे आश्वासित शेतीउत्पन्न न झाल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर उभा राहीला आहे.
सन 2008 मध्ये झालेल्या कर्जमाफीत पात्र शेतकर्‍यांना पुर्ण लाभ मिळाला नाही, मात्र, बँकांची कर्ज वसुल झाली. असे यावेळी होऊ नये म्हणुन सरकार काळजी घेत असुन कोणताही पात्र गरजू शेतकरी सदरील लाभांपासुन वंचित राहणार नाही या बाबत बँकांनी दक्षता घ्यावी अशा सुचना केल्यात.

यावेळी विशेष अतिथी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की, शासनाकडुन दि.30 जूनअखेर थकीत सभासदांसाठी कर्जमाफी घोषीत करण्यात आली असून सत्वर कर्जपुरवठा होण्याच्या दृष्टीकोणातुन अशा शेतकर्‍यांसाठी शासनाकडुन दहा हजार रुपये कर्जरुपी अर्थसहाय्य त्वरित वितरीत करण्याचे दृष्टीने आदेश करण्यात आले असून सदर कर्जाची शासनाने हमी घेतली आहे.

या कामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना राज्य सहकारी बँकेकडुन निधी उपलब्ध करण्याबाबत शासन स्तरावरुन पाठपुरावा करण्यात येत आहे.

तथापि राष्ट्रीयकृत बँकानी अडचण नसल्याने पुढाकार घेऊन अग्रेसर रहावे, याबाबत दर आठवडयास बँकर्स, कृषीविभाग व बँकाचे अधिकारी वर्गाची वेळोवेळी संयुक्त सभा घेऊन आढावा घेण्याबाबत सुचना केल्या.

प्रास्ताविकात जिल्हा उपनिबंधक-सहकारी संस्था यांनी तळोदा तालुक्यातील 41 प्राथमिक सहसंस्थांपैकी 13 संस्था या अवसायनात आहेत.

तसेच अक्कलकुवा तालुक्यातील 25 प्राथमिक सहसंस्थांपैकी 18 अशा एकुण 66 पैकी 31 संस्था या अवसायनात गेल्याने तळागाळातील ग्रामीण पातळीवर कर्जवितरणांस अडचण निर्माण होत असून सदर संस्थांचे सचिवांचे पगारदेखील थकीत असल्याचे सांगत जिल्हा उपनिबंधक यांनी आ.पाडवी यांनी याबाबत विशेष लक्ष घालुन संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याबाबत विनंती केली.

महाराष्ट्र शासनाच्या या सुलभ पीक कर्ज अभियान 2017 अंतर्गत आयोजीत कृषीकर्ज मेळावा कार्यक्रमात तालूक्यातील नियमित कर्ज भरणा करणार्‍या 05 शेतकरी सभासदांना प्रातिनिधिक स्वरुपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पीक कर्जाचे धनादेश वितरीत करण्यात आले.

उर्वरीत पात्र शेतकर्‍यांनी संबंधीत राष्ट्रीयकृत बँका, विविध कार्यकारी संस्था व जिल्हा बँकेशी संपर्क साधावा असे स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमास तळोदा-शहादा मतदार संघाचे आ.उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा उपनिबंधक-सहकारी संस्था वाय.एस.पुरी, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तळोदा तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी शरद मगर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तळोद्याचे पी.बी.पाडवी, मोती अर्बन बॅकेचे अध्यक्ष निखीलभाई तुरखिया, तालुका कृषी अधिकारी पी.व्ही.भोर, प्रतापपुरचे सुरेश इंद्रजीत, तळोदा खरेदी-विक्री संघाचे संचालक अरविंद मगरे, चिनोदा येथील धनराज मराठे तसेच बँक अधिकारी वर्गात भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी सुजित झोडगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी पी.पी. मराठे, तपासणीस जे.पी. मराठे, विकासदिप राणे, सेंट्रल बँकेचे नाईकवाडी, मोती अर्बन बँकेचे मॅनेजर वसत पाटील आदी अधिकारी वर्गांसह तळोदा तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांचे सहकार अधिकारी देवरे, महाजन व अक्कलकुवाचे सहकार अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमास सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन, सचिव, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

*