‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत 33 बालकांचा शोध

0
नंदुरबार । दि.2 । प्रतिनिधी-ऑपरेशन मुस्कान मोहिमेंंतर्गत जिल्हयात 33 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. यापैकी 16 मुलामुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे तर उर्वरित बालकांना बालसंरक्षण गृहात पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2014 पासून ऑपरेशन मुस्कान ही मोहीम दरवर्षी 1 ते 31 जुलै या कालावधीत राबविण्यात येत असते.
या मोहिमेअंतर्गत अपहृत, अल्पवयीन मुले, मुली तसेच बेवारस, भिक मागणारे, कचरा गोळा करणारे, समाजाच्या मुख्य प्रवाहापासुन वंचीत असणार्‍या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांकडे किंवा बालसंरक्षण गृहाकडे सुपुर्द करण्यात येते.

सन 2017 साली नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे संपूर्ण जिल्हयात ऑपरेशन मुस्कान यशस्वीपणे राबविले. त्यामध्ये जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हयातील बाल संरक्षण गृहे, बालकांसाठी काम करणार्‍या अशासकीय संस्था व बाल पोलीस पथकातील अधिकारी, कर्मचारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतला.

सर्व घटकातील अधिकारी व कर्मचार्‍यांची जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात समन्वय बैठक घेवून ऑपरेशन मुस्कान प्रभावीपणे राबविण्यासाठी रुपरेषा ठरविण्यात आली.

त्याअन्वये संपुर्ण मोहिमेदरम्यान जिल्हयातील वेगवेगळे रेल्वेस्टेशन, बसस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे याठिकाणी काम करणारे बालके, भिक मागणारी, कचरा गोळा करणारी बालके यांचा शोध घेतला.

वरील संपुर्ण कारवाईमध्ये अपहृत 8 मुले व 8 मुली शोधुन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले. जिल्हयातील नंदुरबार शहर, नवापूर, शहादा, तळोदा व अक्कलकुवा या शहरांमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व जिल्हा बाल संरक्षण कक्ष महिला बाल विकासचे अधिकारी व स्थानिक पोलीस यांनी घेतलेल्या शोध कार्यामध्ये एकुण 17 अल्पवयीन मुले-मुली भिक मागतांना, बालकामगार म्हणून काम करताना मिळून आले. त्यापैकी पालक असलेल्या मुला-मुलींना समक्ष बोलावून त्यांचे समुपदेशन करुन शिक्षणाची व बालहक्कांची माहिती देवून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या मोहिमेअंतर्गत नंदुरबार शहरात शिवमान रामकृपाल कुशवाहा रा. मध्यप्रदेश या 17 वर्षाच्या मनोरुग्ण मुलास अत्यंत कुशलतेने विचारपूस करुन त्याच्या आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच ईस्माईल ऊर्फ भुर्‍या आयुब शेख (वय 03 वर्ष) या अपहृत मुलाचा सुरत येथे शोध घेवून त्यालादेखील पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नेमलेल्या विशेष पथकाने जिल्हयातील सर्व शहरांना भेटी देवून एकुण 14 अल्पवयीन मुलं- मुली शोधून व त्यांना त्यांच्या पालकांचा शोध घेवून त्यांना व संबंधीत हॉटेल चालकांना योग्य ती कायदयाची समज दिली. तसेच पालक नसलेल्या बालकांना बालसंरक्षण गृहात पाठविण्याची दक्षता घेऊन मोलाची कामगिरी बजावली.

या मोहिमेदरम्यान एकुण 33 अल्पवयीन बालकांना शोधण्यात यश आले. संपुर्ण मोहिम पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पोलीस निरीक्षक श्री.डांगे, पोलीस निरीक्षक श्री.राजपुत, सपोनि न्हायदे, पोसई राऊत, पोसई निकम, पोसई गुळीग, पोसई भदाणे, पोसई सैदाणे, असई रचना शिंदे, पोहेकॉ सुजाता जाधव, मपोना ज्योती पाटील, पोहेकॉ विनोद जाधव, चालक पोकॉ निलेश पावरा, पोकॉ. गजानन राठोड, तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष महिला बाल विकास कार्यालय नंदुरबारचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पी.बी. देवरे, संरक्षण अधिकारी मिनाक्षी कोळी, बालक कल्याण समितीचे अध्यक्ष ईश्वर धामणे यांनी राबविली.

 

 

LEAVE A REPLY

*