वीज चोरीप्रकरणी शहादा येथील एकास कारावास

नंदुरबार । प्रतिनिधी-वीज चोरी प्रकरणी शहादा सत्र न्यायालयाने विनायक निंबा पवार (रा.शहादा) यांना घरगुती वीज मीटरमध्ये फेरफार करुन वीजचोरी केल्याबद्दल एक वर्ष कारावास व रुपये 16 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
नंदुरबार येथील महावितरणच्या भरारी पथकाने वीज चोरीविरुध्द कारवाई करुन महावितरणच्या नाशिक पोलिस स्टेशन येथे गुन्हा नं. 102/12 प्रमाणे दि.21 जानेवारी 2012 रोजी गुन्हा नोंद केला होता.
दि.30 डिसेंबर 2011 रोजी भरारी पथकाने सदर ग्राहकाच्या घरगुती वीज पुरवठा व विद्युत संच मांडणीची तपासणी केली असता वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आले.

संबंधीताने वीज मीटरमध्ये वीज खांबावरुन येणारी व वीज मीटरमधुन जाणारी न्युट्रल (आर्थिंग) वायर काढलेली होती. त्यामुळे वीज मीटर ग्राहकाचा वीज वापर नोंदवित नव्हते.

भरारी पथकाचे तत्कालिन उपकार्यकारी अभियंता बी.एस.तायडे यांनी या वीज चोरी प्रकरणाचा छडा लावला.विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 नुसार शहादा सत्र न्यायालयात दोषीविरुध्द खटला चालविण्यात आला.

सत्र न्यायालयाने दोषीस विद्युत अधिनियम 2003 चे कलम 135(1)(ब) व (क) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 235 (1) नुसार एक वर्ष कारावास व रुपये 16 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

 

LEAVE A REPLY

*