आठ कोटीच्या निधीची आवश्यकता

0
शहादा / शहादा-तळोदा मतदार संघातील लघुपाटबंधार्‍यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 7 कोटी 72 लाख रुपयांचा अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे, यासाठी आपल्या स्तरावरुन पाठपुरावा करुन निधी मंजूर करावा, अशी मागणी आ.उदेसिंग पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आ.उदेसिंग पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील दुधखेडा, लंगडीभवानी, शहाणे व कोंढावळ तसेच तळोदा तालुक्यातील रोझवा, पाडळपूर, गाढवली आणि सिंगपुर ल.पा. योजना सुरू असून त्यांची देखभाल व दुरूस्ती न केल्यामुळे मेनगेट दुरूस्ती, पाणी गळणे, सांडवा दुरूस्ती, गाळ काढणे, मातीचा भराव कमकुवत होणे, दगडी खुर तसेच सांडवा दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

या योजनांच्या दुरूस्तीसाठी 7 कोटी 72 लाख 12 रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. सदर दुरूस्तीचे कामे वेळेत न केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते.

योजना तयार होवून 30 ते 40 वर्षे झालेली आहे. यामुळे अंदाजे प्रत्येक योजनेतून 250 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे.

परंतु किरकोळ दुरूस्तीची, सांडव्याची दुरूस्ती, गाळ काढणे काढणे, मेनगेट दुरूस्ती, पाटचार्‍या दुरूस्ती आदी कामे होत नसल्याने यांचा काहीही उपयोग शेतकर्‍यांना होत नाही.

सदर साधन सामुग्री उपलब्ध असूनही दुरूस्तीची कामे न झाल्यामुळे पाणी शेतकर्‍यांच्या शेतापावेतो पोहचू शकले नाही. तरी सदर ल.पा. योजनांचा शेतकर्‍यांना लाभ मिळावा. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.

दुधखेडा लघुपाटबंधारे योजनेचे काम 1971 मध्ये पूर्ण झाले असून धरणाचा मातीभराव मजबूतीकरण करणे आवश्यक असून दगडी खुर व अश्मपटल तसेच सांडवा दुरूस्त करणे आवश्यक आहे.

यासाठी 2 कोटी 22 लाख 11 रुपयांचे अंदाजपत्रक तापी विकास महामंडळ जळगाव कार्यालयास सादर करण्यात आले आहे. लंगडीभवानी योजनेच्या कालव्याचे 2012-13 मध्ये दुरूस्ती नुतनीकरण व पुनर्स्थापनामध्ये पूर्ण करण्यात आले.

शहाणे योजनेचे काम सन 1999 मध्ये पूर्ण झाले असून धरणाचे मुख्य विमोचक मधून पाण्याची गळती होत असते. कोंढावळ येाजनेचे योजनेचे काम सन 1942 मध्ये पूर्ण झाले असून कालव्याचे दुरूस्तीचे काम महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प योजनेतंर्गत पूर्ण झाले आहे.

रोझवा योजनेचे एकूण सिंचन क्षेत्र 260 हेक्टर असून एकूण पाणीसाठा 1.74 दलघमी आहे. या योजनेचे मुख्य विमोचक व सांडव्यातून मोठया प्रमाणावर पाण्याची गळती होते.

कालव्याचे भराव कमकुवत झाले असून दगडी बांधकामे तुटली असल्याने संधानकात दुरूस्ती करणे आवश्यक आहे. 185. 46 लक्ष किंमतीचे दुरूस्ती अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून विभागीय कार्यालयास मंजूरीसाठी सादर केलेले आहे.

पाडळपूर योजनेचे एकूण सिंचन क्षेत्र 280 हेक्टर असून एकूण पाणीसाठा 1.7 दलघमी आहे. या योजनेच्या मुख्य विमोचकातून मोठया प्रमाणावर पाण्याची गळती होते.

कालव्याचे भराव कमकुवत झाले असून दगडी बांधकामे तुटली असल्याने संधानकात दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी 117.14 लक्ष किमतीचे दुरूस्ती अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून विभागीय कार्यालयास मंजूरीसाठी सादर केलेले आहे.

गढावली योजनेचे एकूण सिंचन क्षेत्र 123 हेक्टर असून एकूण पाणीसाठा 0.94 दलघमी आहे. या कालव्याचा भराव कमकुवत झालेला असून दगडी बांधकामे तुटली असल्याने संधानकात दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

सदर ल.पा.योजनेचे 48.54 लक्ष किंमतीचे दुरूस्तीचे अंदाजपत्रकत तयार करण्यात आले असून विभागीय कार्यालयास मंजूरीसाठी सादर केलेले आहे. सिंगसपूर योजनेचे एकूण सिंचन क्षेत्र 260 हेक्टर असून एकूण पाणीसाठा 2.27 दलघमी आहे.

या धरणात 7 मीटर उंचीपर्यंत गाळ साचला असल्याने संधानकात दुरूस्ती करणे आवश्यक आहे. सदर ल.पा. योजनेचे 180.87 लक्ष किंमतीचे दुरूस्तीचे तसेच धरणातील गाळ काढणे 151.62 लक्ष किंमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून विभागीय कार्यालयास मंजूरीसाठी सादर केलेले आहे.

ल.पा. योजनांचे विमोचकामधील लोखंडी द्वारांची दुरूस्ती होण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून यांत्रिकी विभागाकडून काम करण्याचे प्रगतीपथावर आहे.

विमोचकद्वारांचे दुरूस्तीमुळे धरण पाणीसाठयात मुबलक वाढ होवून सिंचन क्षेत्रास पुरेपूर पाणी देणे सोयीचे होणार आहे. या सर्व लघुप्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी आ.पाडवी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*