चेतक महोत्सवाला उद्या जपानचे शिष्टमंडळ येणार !

0

नंदुरबार ।सारंगखेडा येथील यात्रौत्सवानिमित्त आयोजित चेतक फेस्टीवलला जपानचे शिष्टमंडळ दि. 3 डिसेंबर रोजी सारंगखेडा येथे येणार आहेत. पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांनी जपान सरकारला निमंत्रण दिले होते, त्यानुसार हे शिष्टमंडळ येणार आहे.

दि. 3 डिसेंबरपासून सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभुंच्या यात्रौत्सवास सुरुवात होत आहे. घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत सुमारे बाराशे घोडे दाखल झाले आहेत.

गेल्या वर्षापासून पर्यटन विभागाच्या सहकार्याने येथे चेतक फेस्टीवल भरविण्यात येत आहे. यावर्षीही चेतक फेस्टीव्हल व्यापक स्वरुपात भरविण्यात येणार आहे.

चेतक फेस्टीवलचे उद्घानट पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाला पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जागतिक स्तरावर नेण्यासाठी जपान सरकारला निमंत्रण दिले होते. त्यानुसार जपान सरकारचे शिष्टमंडळ दि.3 रोजी सारंगखेडा येथे दाखल होणार आहे.

यावेळी वाकायामा प्रिफेक्चर गव्हर्नमेंटचे श्री.योशियो यामाशिता, वाकायामा प्रिफेक्चर गव्हर्न्मेंटच्या आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे ओनिशी तात्सुनोरी आणि इतर जपानी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक, देशभरातील आणि परदेशातील पर्यटक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

सारंगखेडा चेतक महोत्सव 2017 साठी देशभरातील विविध भागांतून घोडे सहभागी होत असतात. या ठिकाणी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, अफगाणिस्तान आणि गुजरात इत्यादी भागांतून आलेल्या घोड्यांचे प्रदर्शन असते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी प्रचंड संधी आहेत आणि सारंगखेडा चेतक महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणीच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक संधी आहे. हॉर्स शो सारख्या कलाप्रकारांपासून क्रीडा व नृत्यसादरीकरणांपर्यंत विविध कार्यक्रमांचा या महोत्सवात समावेश आहे. हा 31 दिवसांचा महोत्सव जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ आहे. या माध्यमातून येथील कला, संस्कृती आणि विविध पैलू यावर प्रकाश टाकणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

या महोत्सवाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार करण्यासाठी राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री ना जयकुमार रावल, एमटीडीसी आणि महोत्सवाच्या आयोजकांनी नंदूरबारसाठी वेबसाईट तयार केली आहे. एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशनही विकसित केले आहे आणि या भागात येणार्‍या पर्यटकांना माहिती मिळावी या हेतूने एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे

पर्यटन विभाग आणि एमटीडीसीतर्फे अजिंठा-वेरूळ महोत्सव, नागपूर महोत्सव, कोराडी महोत्सव, कालिदास महोत्सव आणि आता सारंगखेडा चेतक महोत्सव आदी आयोजित करण्यात येतात.

अतिथी देवो भव हे ब्रीद प्रत्यक्षात
आणत येत्या वर्षात पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा आणि सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील आकर्षणाची केंद्रे आणि विविध अंगे अधोरेखित करण्यासाठी पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पीय निधीचा वापर करणार आहोत.

सारंगखेडा यात्रेला 300 वर्षांची परंपरा आहे, पण इतकी वर्ष हा महोत्सव दुर्लक्षित राहिला आहे. पण आता पायाभूत सुविधांचा विकास, मार्केटिंग आणि ब्रँडिंग करून हा चेतक महोत्सव जगाच्या नकाशावर नेण्यास प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे अश्व संग्रहालय बांधण्याची पर्यटन विभागाची योजना आहे. या संग्रहालयात पर्यटकांना घोड्यांचा वंश, त्याचे गुणधर्म, रंग, खुणा, आयुर्मान इत्यादींविषयी जाणून घेता येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून नंदूरबार जिल्ह्याचा आर्थिक विकास व्हावा आणि पर्यटकांचे प्रमाण वाढावे ही पर्यटन विभाग आणि एमटीडीसीची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

*