शहाद्याच्या गरीब नवाज कॉलनीत कृत्रिम पाणीटंचाई

0

शहादा । ता.प्र.-येथील गरीब नवाज कॉलनीतील सुफ्फा शाळेनजीकच्या रहिवाशांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पालिका पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील रहिवाशी हैराण झाले आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास चालू वर्षाची नळपट्टी न भरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांना गरीब नवाज कॉलनीतील सुफ्फा शाळेजवळ राहणार्‍या रहिवाश्यांनी वेळोवेळी भेटून परिस्थिती कथन केली आहे.

मात्र, पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे सुमारे आठ महिन्यांपासून कृत्रिम पाणी टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. गत मार्च 2017 पासून शाळेच्या परिसरातील नळांना पाणी येत नाही.

पालिकेची विंधनविहिर नादुरूस्त झाली असून दुसर्‍या ठिकाणच्या विंधनविहिरीतून पाणी पुरवठा होता. मात्र, याठिकाणी काही मोजक्याच रहिवाश्यांचे कनेक्शन जोडण्यात आले आहे.

तापी पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे बोअरिंगची पाईपलाईन गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त झाली आहे.

याबाबत पालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या तसेच संबंधित अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून अनेकदा विनंती केली आहे. मात्र, दुर्लक्षित धोरणामुळे पाईपलाईन दुरूस्तीचे काम करण्यात आलेले नाही.

गरीब नवाज कॉलनीतील मिस्बाह मशिदीमागे असलेल्या सुफ्फा शाळेजवळील नळ कनेक्शन जलवाहिनीस जोडून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा या भागातील रहिवासी चालू वर्षाची नळपट्टी भरणार नाहीत असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नुरानी नूर, राजरत्न अहिरे, सहिदाबी मुनाकील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*