अतिक्रमण न काढल्यास निवडणुकीवर बहिष्कार ; अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर

0

तळोदा । ता.प्र.-शहरातील मोठा माळीवाड्यात गटार व रस्त्याचे बांधकाम पालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे. परंतु हे बांधकाम गल्लीतील अतिक्रमण काढल्याशिवाय करू नये अन्यथा आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकून उपोषण करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

तळोदा शहरातील मोठा माळीवाड्यात विष्णू मुरार माळी यांच्या पिठाच्या बंद गिरणी पासून ते तुळशीराम भिका देवरे यांच्या घरापर्यंत दुतर्फा गटारींचे व रस्त्याचे बांधकाम नगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे.

या आधीसुद्धा येथील रस्त्याचे व गटारींचे काम पालिकेने सुरू केले होते. परंतु येथील गटारीवर व रस्त्या वर अनेकांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आहे, ते अतिक्रमण जैसे थे ठेवून पालिका गटार व रस्त्याचे काम करीत होती.

म्हणून तेव्हा येथील नागरिकांनी अतिक्रमण काढून रस्ता व गटारींचे काम करावे अशी मागणी केली असता पालिकेने कामच बंद केले होते, तेच काम पुन्हा पालिकेतर्फे पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

परंतु अतिक्रमण जैसे थे ठेवण्यात आले असल्याने येथील नागरिकांनी तळोदा पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की गल्लीत मोठया प्रमाणावर अतिक्रमण केले असून या अतिक्रमणामुळे या गल्लीत कचरा संकलन करणारे ट्रॅक्टर अग्निशमन बंब व रुग्णवाहिका येऊ शकत नसल्याने या गल्लीत नेहमी अस्वच्छता राहत असून अग्नी उपद्रव झाल्यास किंवा एखाद्या रुग्ण अत्यवस्थ झाल्यास अग्निशमन बंब अथवा रुग्णवाहिका उपयोगात येत नाही तसेच चार चाकी वाहन सुद्धा जात नाही त्यामुळे अनेक छोटे मोठे वाद व समस्या निर्माण होतात.

सध्या पालिकेतर्फे गल्लीमध्ये गटार व रस्त्याचे बांधकाम हाती घेतले असून अतिक्रमणधारकांनी गटारी व रस्त्यावर ओटे बांधून व जिने ठेवून अतिक्रमण केले आहे.

आपले अतिक्रमण वाचविण्यासाठी संबंधित अतिक्रमण धारक हे गटारींचे काम करू देत नाहीत तरी पालिकेने रीतसर अतिक्रमण काढावे व गटार आणि रस्त्याचे बांधकाम करावे अन्यथा गल्लीतील रहिवासी पालिकेसमोर उपोषणास बसू व आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनावर चंद्रकांत सूर्यवंशी, सतिष मगरे, महेश माळी, विलास माळी, गुलाब सूर्यवंशी, नरेंद्र सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी, महेंद्र सूर्यवंशी, सतिष मगरे, रमेश चौधरी आदी 41 महिला व पुरुषांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*