मोलगीला तालुक्याचा दर्जा मिळेल काय?

0
प्रा.के.डी.पाठक,अक्कलकुवा / महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि.17 रोजी मोलगी या दुर्गम भागाला भेट देण्यासाठी येत आहेत.
मोलगी हा तालुका व्हावा ही मोलगी-भगदरी परिसरातील आदिवासी बांधवांची आग्रहाची व हक्काची मागणी आहे. युती शासनाच्या काळात नंदुरबार जिल्हा निर्मिती झाली होती.
आतादेखील युती शासन आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून मोलगी हा तालुका जाहीर करण्याची घोषणा करणे परिसरातील नागरिकांना अपेक्षित आहे.
मोलगी हे अक्कलकुवा तालुक्यातील सर्वात मोठे गाव व सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील अनेक गावांचा मोलगीशी दैनंदिन संबंध येत असतो.

मोलगी परिसराला निसर्गसौदर्यंही लाभले आहे. मोलगी हा तालुका व्हावा यासाठी कै.गोपीनाथ मुंडे व कै.प्रमोद महाजन हेदेखील आग्रही होते. किमान त्यांच्या निधनानंतर का होईना भाजपा शासनाकडून हा तालुका जाहीर होणे ही भाजपाच्या दोन्ही दिवंगत नेत्यांची स्वप्नपूर्ती होणार आहे.

आतापर्यंत या तालुक्यासाठी भाजपाकडून आमदारकीची निवडणूक लढतांना प्रत्येकाकडून या तालुक्याच्या निर्मितीचे आश्वासन मोलगी परिसरातील मतदारांना दिलेले आहे. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले आहे.

मोलगी परिसरातील जनता ही दुर्गम व अतिदुर्गम परिसरात मोडते. मोलगी तालुका झाल्यास त्यांना प्रशासकीय कामे करणे सोईचे व सोपे होणार आहे.

मागे तालुका होणार म्हण्ाून जोरात हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र ऐनवेळी खो दिला गेला व जनतेमध्ये नाराजी पसरली होती.

दरम्यान, 1998 साली युती शासनाच्या काळात नंदुरबार जिल्हानिर्मिती करण्यात आली होती. आतादेखील राज्यात युती शासन आहे.

त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या दौर्‍यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नी वैयक्तिक लक्ष घालून तालुका जाहीर करण्याबाबत सकारात्मक घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.

या प्रश्नी भाजपाचे माजी आ.डॉ.नरेंद्र पाडवी हे आग्रहीपणे ही मागणी लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*