मुख्यमंत्र्यांची सभा उधळणार्‍या 38 जणांना नोटीस

0
धुळे / मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यात येत असून त्यांच्या सभेत गडबड, गोंधळ केल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीसा विविध राजकीय पक्षांच्या 38 पदाधिकार्‍यांना बजावण्यात आल्या आहेत.
यात शिवसेनेच्या स्थानिक 11 पदाधिकार्‍यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक, समाजवादी अशा पक्षांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळे शहरातील पांझरा नदीत सभा असून राष्ट्रवादी कारँग्रेस पक्षाने मात्र ही सभा उधळण्याचा इशारा दिला आहे.

यामुळे गेल्या आठ दिवसांपासून धुळे शहरातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने राष्ट्रवादी पक्षाच्या 11 पदाधिकार्‍यांना तसेच शिवसेनेच्या 11 पदाधिकार्‍यांना नोटीस बजावल्या आहेत.

यात काँग्रेस, युवक काँग्रेस, समाजवादी पार्टीचे पदाधिकार्‍यांसह 38 जणांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसांमुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी संताप व्यक्त केला असून पोलिस प्रशासन शिवसेनेला विरोधकांसारखी वागवणूक देत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या सभा उधळून लावण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. किंवा असा कोणता इशाराही दिलेला नाही.

त्यामुळे या नोटीसा कशाच्या आधारे दिल्या गेल्या आहेत, हा प्रश्न शिवसेनेला पडला आहे.मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलिसांनी सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेसाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 149 नुसार इशारा दिला आहे.

राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना नोटीसा बजावून पदाधिकार्‍यांचे समर्थक वा कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास कोणत्याही प्रकारची बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांना जबाबदार धरले जाईल, असे पोलिसांनी नोटीसीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*