दररोज हजारो ब्रास वाळूची वाहतूक

0
नंदुरबार / जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांकडून नियमांची खुलेआम पायमल्ली केली जात आहे.
शासनाने वाळू वाहतूकीचे धोरण जाहीर करतांना लोकसहभाग, पर्यावरणाचा र्‍हास टाळणे, पारंपारिक व्यवसाय करणार्‍यांचा हिताचे रक्षण या बाबी लक्षात घेतल्या आहेत.
परंतू ठेकेदारांकडून नदीतून वाळू काढण्यापासून वाहतूकीपर्यंतच्या सर्व नियमांची पायमल्ली केली जात आहे. एकाच पावतीवर अनेक ब्रास वाळूची वाहतूक केली जात आहे.
यात शासकीय अधिकार्‍यांचाही समावेश असल्याचे समजते. त्यामुळे अवैध वाळू उपशाबाबत प्रशासन उदासिन दिसत आहे. याबाबत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेवून संबंधीत ठेकेदार व अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही वर्षापासून नंदुरबार जिल्हयातील तापी नदीची वाळू सोन्याच्या भावाने विक्री होत आहे. ही वाळू मुंबई पुणे, नाशिकसारख्या महानगरांमध्ये अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे.
एक हजार रुपये ब्रासने विकली जाणारी वाळू पाच ते दहा हजारापर्यंत विक्री होत आहे. त्यामुळे ठेकेदारांना तापीच्या पाण्यामध्ये सोन्याची खाण सापडलेली दिसत आहे.

या खाणीतून वाळू ठेकेदार रात्रंदिवस वाळूचा उपसा करुन कोटयावधींची माया जमवत आहेत. सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत वाळू उत्खनन करण्यास शासनाची बंदी असतांना याच कालीवधीत वाळूचा जास्तीत जास्त उपसा होत आहे.

त्यामुळे शासनाचा कोटयावधीचा महसूल बुडविला जात आहे. वाळूचे उत्खनन नदीपात्रात केवळ 5 फुट किंवा भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेने ठरविलेल्या मर्यादेतच करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्हयातील बहुतांश ठेकेदारांनी नदीपात्रात 15 ते 20 फुटावर वाळूचे उत्खनन केलेले दिसत आहे.

तापी नदी किनार्‍यावरील वाळू ठिय्यालगत असलेल्या सर्वच गावांना वाळू वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाळू वाहतुकीमुळे लगतच्या गावातील सर्व रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सुरू झाला.

परिणामी ग्रामस्थांनी वाळूच्या ठेक्याबाबत वाहतुकीबाबत शासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, मुग गिळून गप्प बसलेल्या अधिकार्‍यांकडून कुठलीही कारवाई होतांना दिसत नाही.

संबंधित ठेकेदारांना त्याच्या वाळूच्या ठिय्यावर एक फलक लावून त्यात तपशिल लिहिणे, ठेकेदारांचे नाव, ठिय्याचे गाव, लोकेशन, एकुण वाळू क्षेत्राबाबत सीमा रेषा आखणे, वाळू ठेक्याची निर्धारित रक्कम आदी बाबींची त्यात तपशिलवार माहिती असणे आवश्यक असतांना अशी कोणतीच माहिती ठेकेदार फलकावर लिहितांना दिसत नाहीत.

नदी पात्रातून कोणत्याही परिस्थितीत दोन मीटरपेक्षा जास्त खोलीपर्यंत खोदकाम करण्याची परवानगी नसतांना वाळू ठिय्यावर ठरविलेल्या दोन मिटर खोलीपेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात खड्डे पाडून वाळू काढली जात आहे.

वाळू थराची जाडी सातत्याने राहण्यासाठी बेंंच मार्क निश्चित करून बेंंचमार्क खाली कोणत्याही परिस्थितीत वाळूचे उत्खनन नये. असे असतांना मात्र ठेकेंदार स्वत:च्या स्वार्थासाठी नियंमाची पायमल्ली करून बेंचमार्कच्या खाली मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करीत आहेत.

वाळूचे उत्खनन केवळ सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजता या कालावधीत व्हावे अशी काटेकोरपणे सुचना असतांना वाळू उत्खननाचे काम रात्रंदिवस सुरु आहे.

नदी किनार्‍यावरील गावकर्‍यांना रात्री काढल्या जाणार्‍या वाळुमुळे मशीनच्या आवाजामुळे त्रास होत आहे. वाळूची वाहतूक करतांना वाहनातील वाळू प्लॅस्टीक पेपरने/ ताडपत्रीने आच्छादित करूनच वाळूची वाहतूक करणे आवश्यक असतांना तसे न करता वाळू वाहन धारक वाळू वाहतूक करीत आहेत.

त्यांनी वाहनांमागून येणार्‍या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनधारकरांच्या डोेळ्यात वाळू जावून अपघात होत आहेत. वाळूची वाहतूक करणार्‍या वाहनास त्याच्या क्षमतेइतक्याच परिणामाची वाहतूक पावती घ्यावी.

कोणतीही वाहने त्यापेक्षा अधिक प्रमाणात वाळू वाहतूक करीत असल्यास त्यातील संपूर्ण गौण खनिज अवैध आहे, असे समजून त्यावर मोटर वाहन कायद्यानूसार कार्यवाही करावी, असा नियम असतांना वाहन क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीची पावती देण्यात येत आहे.

वाळू वाहतुकीसाठी शासनाकडून दिलेली पावती किती क्रमांकापयर्ंत दिली याची कोणलाच माहिती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नकली पावत्यांचा वापर होत आहे.

याकडेे महसूल, उपप्रादेशिक परिवहन व पोलीस प्रशासनाकडून बुध्दीपुरस्कार डोेळेझाकपणा केला जात आहे. एकेका ठिय्यावर 15 ते 20 बोटी एकाच वेळेस वाळू उत्खनन करीत आहेत.

एक बोट कमीत कमी दररोज 300 ब्रास वाळू उत्खनन करीत आहे. अर्थात 15 बोटींमार्फत कमीत कमी 4500 ब्रास वाळूचे दररोज उत्खनन होत आहे. याची नोंद प्रशासकीय अधिकारी घेत नाहीत. दर दिवशी चार ते पाच हजार ब्रास वाळूचे उत्खनन होत आहे. याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

दरम्यान, ओव्हरलोड गाडया या प्रकाशा व सारंगखेडा मार्गे मुंबई, पुणे, नाशिककडे रवाना होत असतांना रस्त्यांची पूर्णतः वाट लागत असून नंदुरबार शहरातील गावाबाहेर असलेल्या उड्डाणपुलाला या ओव्हरलोडेड गाडयांमुळे धोका निर्माण झाला आहे.

याकडे संबंधीत अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे तसेच उद्या दि. 17 रोजी मुख्यमंत्री मोलगी दौर्‍यावर येत आहेत, त्यांनीही याबाबत दखल घेवून संबंधीत अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*