शहादा । दि.29 । ता.प्र.- खान्देशच्या विकासाचे स्वप्न स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांनी पाहीले होते.त्याकरीता सर्वपक्षीय नेत्यांनी संघटीत प्रयत्न करणे गरजेचेआहे. कृषी विकास घडवून आणण्यासाठी खान्देशचे स्वतंत्र कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी आपला आग्रह आहे.
सत्तेत असो वा नसो खान्देशसाठी कृषी विद्यापीठ होण्यासाठीची माझी भूमिका कायम राहणार असल्याचेप्रतिपादन माजी कृषी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केले.
येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पाटीेल कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारत व जैवनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन आ. खडसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी, जिल्हा पोलिस प्रमुख संजय पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, सौ. कांचनबेन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष किशोर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजारामपाटील, उपाध्यक्ष जगदिश पाटील, सातपुडा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रेमसिंग अहेर, दुध संघाचे अध्यक्ष रविंद्र राऊळ, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती माधव पाटील आदी उपस्थित होते.

आमदार खडसे पुढे म्हणाले की, स्वर्गीय अण्णासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत आदिवासी क्षेत्रात शैक्षणिक हब उभारले असून तिच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे. प्रगत शेतीसाठी कृषी शिक्षण आवश्यक आहे.

दर्जेदार उत्पादनासाठी कृषी प्रशिक्षणाची आवश्यकता भासत असते. उत्पादन वाढीसह नविन ज्ञान आत्मसात करण्यासाठी तेवढ्याच दर्जेदार कृषी महाविद्यालयांची गरज आहे. ती अण्णासाहेबांनी पूर्ण केली आहे.

शेतीसाठी पाणी आवश्यक घटक आहे. तापी खोरे विकासाची मूळ संकल्पना स्व. अण्णासाहेबांची असून बॅरेजेसमध्ये अडविण्यात आलेले पाणी शेतीपर्यन्त पोहचणे गरजेचे आहे. शेती, सहकार व शिक्षणाच्या माध्यमातून खान्देशचा विकास होणार असून खान्देशच्या विकासासाठी पक्षभेद विसरून सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे.

विकासाचा दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन संघटीत व्हावे. सद्यस्थितीत शेतकरी निसर्गाशी संघर्ष करीत आहे. प्रगत कृषी तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षित होणे जरूरीचे आहे.

पॉलीहाऊसच्या माध्यमातून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. पाणी, वेळ व श्रमाचीही बचत कृषी प्रशिक्षणातून होते. बांधावर प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेतला तरच शेतीचा विकास शक्य आहे.

खान्देशच्या विकासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याचा पुनरूच्चार केला.आ. रघुवंशी म्हणाले, दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकरी सातत्याने संकटांचा समाना करीत आहे.

काळ्या मातीशी थेट संबंध असलेले ना. खडसे मंत्रीमंडळात राहिले असते तर उपसा सिंचनाचा पश्न सुटण्यास मदत झाली असती. शहादा परिसर स्वर्गीय आण्णासाहेबांची कर्मभूमी आहे.

याठिकाणी राजकारण विरहीत विकासाच्या मुद्यावर विविध पक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. शेतीच्या माध्यमातून विकास शक्य होणार असल्याने नोकरी पेक्षा शेतीला प्राधान्य देण्याचे आवाहन आ. रघुवंशी यांनी यावेळी केले.

संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील म्हणाले, शेतकरी व कष्टकरी जनतेच्या सहकार्यातून स्व. अण्णासाहेबांनी संस्थेची उभारणी केली. त्यांनी मंगलकार्य प्रसंगी विद्यादान देण्याची प्रेरणा परिसरातील समाजात रूजवीली.

याठिकाणी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य होत असून दर्जेदार व उत्कृष्ट शिक्षणातून विकासाची दिशा दिले जाते.

कृषी शिक्षणाची गरज ओळखून अद्ययावत इमारत व जैव नियंत्रण प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष विजय पाटील, अरविंद कुवर, दिपक पटेल, पं.स. माजी उपसभापती बापू जगदेव, प्रा.संजय जाधव, अ‍ॅड. पी.सी.पाटील, कमलताई पतसंसथेचे संस्थापक एन.के. पाटील, हैदरअली नुरानी संस्थेचे संचालक रमाकांत पाटील, जगदिश पाटील, यशवंत चौधरी, माजी नगरसेवक राकेश पाटील, सुनिल पाटील, यशवंत पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील यांनी केले. पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.विजय प्रकाश शर्मा यांनी सुत्रसंचालन केले. प्राचार्य शरद पाटील यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*