अ‍ॅल्युमिनीयम तारांची चोरी

0
शहादा । ता.प्र.-शहादा व लोणखेडा शिवारातील शेतकर्‍यांच्या शेतातील विद्युत पोलवरील अ‍ॅल्युमिनीयमच्या तारा अज्ञात चोरटयांनी रोहित्र बंद करून चोरुन नेले. दोन दिवसात 32 पोलवरून लाखो रूपयांच्या तारा चोरीला गेल्या आहेत.
शेतकर्‍यांनी या घटनेबाबत अधिकार्‍यांच्या निदर्शनात आणूनदेखील दखल घेतली गेली नाही. खरीप हंगामाच्या तोंडावर तारा चोरीला गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
तालुक्यातील अनेक भागात पाऊस दीड महिना उशिरा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांवर दुबारपेरणीचे संकट आले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे. काही पिकांवर आजार वाढला आहे.

खते, फवारणी करून काहीच प्रतिसाद मिळत नाही. शेतकरी शेती व्यवसायासाठी महावितरण कंपनीकडून शेतात वीज पोल, विद्युत वायरींग व रोहित्राकरीता हजार रुपये खर्र्चीत साहित्य लावले जातात.

त्याच ईलेक्ट्रीक पोलवरून कुपनलिकांपर्यंत कनेक्शन जोडत पाणी बाहेर काढले जाते. ते पाणी शेतातील चारीतून शेतांना सोडले जाते.

शहादा-लोणखेडा परिसरातील सुमारे 30-40 शेतकर्‍यांच्या शेतातून महावितरण वीज कंपनीचे 32 पेक्षा जास्त पोलवरून रोहित्राच्या माध्यमातून वीज प्रवाह सुरू होता.

खरीप हंगामात पाऊस कमी झाल्याने वेळ मिळेल, त्यावेळी कुपनलिकाच्या माध्यमातून पाणी काढत पिकांना दिले जाते. मात्र, गेल्या दोन दिवसात 32 विद्युत पोलवरील विद्युत तार चोरीची घटना घडली आहे.

अज्ञात चोर हे चार-पाच युवक वाहन सोबत घेवून मध्यरात्रीनंतर रोहित्र बंद करून वायर चोरीस नेत असल्याचे समजते. अ‍ॅल्युमिनीयमच्या तारा लाखो रुपये किमतीच्या आहेत.

या चोरीच्या घटनेबाबत मनोज भाईदास पाटील, किशोर नरोत्तम पाटील, उमेश पाटील, वसंत उत्तम पाटील, जयदेव भाऊभाई पाटील, दिनेश पाटील, गणेश पाटील, जीवन पाटील, कल्पेश पटेल, विजय पाटील, योगेश पाटील, भगवानसेन पाटील, उमाकांत पाटील, सुरेश पाटील, शरद पाटील, सचिन पाटील, उमेश रतिलाल पाटील, हितेश राजाराम पाटील, श्रीकांत अरविंद पाटील, निलय विजय पाटील, पुरूषोत्तम सजन पाटील यांसह अनेक शेतकरी यांनी महावितरण वीज कंपनीच्या उपअभियंता यांच्याकडे तक्रार करून शेतकर्‍यांना शेतात त्वरीत ईलेक्ट्रीक वायरींग जोडण्याची मागणी केली आहे.

शेतकर्‍यांनी ईलेक्ट्रीक वायरींग चोरीच्या तक्रार केल्यानंतरदेखील वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी पोलीस स्टेशनला साधी तक्रार करण्याची तसदी घेतली नाही. दोन दिवस झाले, पाऊस थांबला आहे. तापमानात वाढ होत आहे.

पिके करपण्यास सुरूवात झाली आहे. वितरण कंपनीने शेतकर्‍यांची हित लक्षात घेत ईलेक्ट्रीक तार पोलवरील अ‍ॅल्युमिनियम तारा त्वरीत लावाव्यात अशी मागणी होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*