इच्छुकांकडून राजकीय समिकरणांची जुळवाजुळव

0
चेतन इंगळे,मोदलपाडा, ता.तळोदा । दि.10 ।-येथील पालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
इच्छुक उमेदवारांनी देखील आपल्या राजकीय समिकरणांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक इच्छूकांकडून फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.
येथील पालिकेची मुदत नोव्हेंबर अखेर संपत असल्याने शहरातील सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.

प्रत्यक्षात निवडून कार्यक्रम जाहीर झाला नसला तरीही शहरातील राजकारण आतापासूनच तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार सोबत मतदार पुढील रचनेचे व आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन प्रभागांची वाढ होऊन प्रभागांची संख्या 9 झाली आहे तर नगरसेवकांची संख्या देखील एकने वाढून 18 झाली आहे .

शहरातील नवीन वसाहतींचा नगर परिषदेच्या समावेश झाल्याने प्रभागांची व नगरसेवकांची संख्या वाढली आहे. जाहीर करण्यात आलेल्या नवीन प्रभाग रचनेत शहरातील अनेक मातब्बर व प्रस्थपित नेत्यांचे सुरक्षित प्रभाग फुटले आहेत यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नवीन प्रभाग रचनेनुसार आता राजकीय मंडळींनी आपली आगामी रणनीती आखावी लागणार आहे.

प्रभाग रचनेत झालेले हे फेरबदल कोणाच्या किती पथ्यावर पडतात हे समजण्यासाठी निवडणुकीच्या निकालांची वाट पाहावी लागणार आहे.

गेल्या वर्षभरापासून उमेदवारीची तयारी करणारे हौशी व नवशे कार्यकर्ते आपापल्या पक्षाकडे तिकीट मिळविण्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत होते आता प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षश्रेष्ठी व नेत्यांकडे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या उमेदवारांची दावेदारी सांगण्यास सुरुवात केली आहे.

याशिवाय ज्या प्रभागात जे उमेदवार इच्छुक आहेत त्या प्रभागात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्या त्या प्रभागातील नागरिकांच्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठींवर भर देण्याबरोबर विविध कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमाना आवर्जून हजेरी लावतांना दिसून येत आहेत.

एकीकडे आपल्या संभाव्य उमेदवारांच्या प्रभागात जनसंपर्क वाढविणे सोबतच दुसरीकडे पक्षाचे अधिकृत तिकीट व उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न अश्या दोन्ही पातळ्यांवर इच्छुक आपल्या राजकीय समिकरणांची जुळवा जुळव करीत आहेत.

आपल्या आवडीच्या विशेषतः विचारांच्या पक्षाचे तिकीट मिळवण्याच्या इच्छुकांचा कल दिसून येत असून तरी मिळेल त्या पक्षांच्या तिकिटावर उमेदवारी करण्यास देखील अनेक इच्छुक आहेत. काही तर पक्षाचे तिकीट मिळो न मिळो स्वतंत्रपणे लढण्याची तयारी असल्याचेही बोलून दाखवले आहे.

मतदार नोंदणीवर भर
शहरातील नवीन वसाहतीचा नगरपालिकेत समावेश झाल्याने तेथील रहिवासी हे नगरपरिषद निवडणुकीचे नवीन मतदार आहेत. प्रशासनाकडून नवीन मतदार नोंदणी सुरू आहे. याचा फायदा घेत अनेक इच्छुक उमेदवारांनी नवीन वसाहतीतील रहिवाश्यांची, नोकरदारांची नातेवाईकांची मतदार म्हणून आपल्या प्रभागात नोंदणी करण्यासाठी धडपड सुरू आहे. पक्षश्रेष्ठीकडून देखील इच्छुक उमेदवारांना आपापल्या प्रभागात मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

 

LEAVE A REPLY

*