दरा धरणात बुडून तिघा तरुणांचा मृत्यू

0

नरेंद्र बागले,शहादा । दि.9-विश्व आदिवासी दिनानिमीत्त मिळालेल्या सुटीचा लाभ घेत तालुक्यातील उनपदेव, दराधरण येथे पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पाच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी तिघांचा दरा धरणातील पाण्यात बुडून करून अंत झाल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेतून बचावलेल्या दोघा विद्यार्थ्यांपैकी ललीत शामराव पाटील याच्या खबरीवरुन म्हसावद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत तिघे विद्यार्थी शहादा येथील कै.फ.ज.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीचे विद्यार्थी आहेत. घटनेचे वृत्त शहरात येताच सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी गौरव दिनानिमीत्त सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी होती.

  

त्यामुळे शालेय विद्यार्थी सुटीचा आनंद लुटण्यासाठी नियोजनात व्यस्त असल्याने पालकही अनभिज्ञ होते. येथील कै.फ.ज.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात (विकास हायस्कुल) इयत्ता 12 वी चे विद्यार्थी ललीत शामराव पाटील (रा.गणेशनगर शहादा), निखील वसंत निकम रा.तळोदा, तुषार राजेंद्र अहिरराव (रा.वृंदावननगर शहादा), जयेश अशोक सोनवणे (रा.ओमशांती नगर शहादा), चेतन नामदेव बेलदार (रा.लोहारा ता.शहादा) हे शिकतात.

या पाचही मित्रांपैकी ललीत पाटील, निखील निकम व चेतन बेलदार हे तिघेजण शहरात शिक्षणानिमीत्त खाजगी रूम करून राहत होते.

शाळेला सुटी असल्याने ललित पाटील याच्या रूमवर सर्व पाचही मित्रांनी पिकनिकचे नियोजन केले. त्यासाठी ते तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी उनपदेव झरा व दरा धरण येथे पिकनिकसाठी दुचाकीवरून सकाळी अकरा वाजता गेले.

या पाचही जणांनी उनपदेव येथे गरम पाण्याच्या झरा व नदीत आंघोळीचा आनंद लुटला. दरम्यान जयेश सोनवणे याने त्याच्या वडीलांना एक वाजेच्या दरम्यान फोन करून आम्ही क्लास करून मित्राकडे टिव्हीवर कार्यक्रम पाहत असल्याचे सांगितले.

त्यानंतर उनपदेव येथे पिकनिकचा आनंद लुटल्यावर त्यांना पुन्हा उनपदेव लगतच्या दरा धरणावर पोहण्याचा मोह झाला. या धरणावर सर्व मित्र दीड ते 2 वाजेच्या सुमारास पोहोचल्यानंतर धरणालगत कपडे काढून पोहण्यासाठी धरणात उतरले.

मात्र धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच जण पाण्यात बुडू लागले. एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तुषार राजेंद्र अहिरराव (वय 18), चेतन नामदेव बेलदार (वय 18), जयेश अशोक सोनवणे (वय 18) हे तिघे जण खोल पाण्यात बुडाल्याने त्यांच करूण अंत झाला. तर ललीत शामराव पाटील व निखील वसंत निकुम हे दोघे जण एकमेकांना घट्ट पकडून पाण्याबाहेर आल्याने या दुर्दैवी घटनेतून बचावले.

दरम्यान तुषार, चेतन व जयेश पाण्यात बुडत असताना निखील व ललीत यांनी आरडाओरड केल्याने धरणालगतच्या शेतातून काही लोकांनी धाव घेत या तिघांना बाहेर काढले.

मात्र, या तिघांचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांनी घटनेची माहिती म्हसावद पोलीसाना दिल्यानंतर त्यांनी खाजगी वाहनातून तात्काळ म्हसावद ग्रामीण रूग्णालयात आणले. पण वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्या तिघांना मृत घोषित केले.

या घटनेचे वृत्त शहरात पोहचताच शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. मयत तुषार व चेतन हे बांधकाम ठेकेदार अनुक्रमे राजेंद्र अहिरराव व नामदेव बैलदार यांची मुले आहेत.

जयेश हा मंदाणा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अशोक सोनवणे यांचा मुलगा आहे. तुषार व जयेश हे त्यांच्या परिवारातील एकूलती एक मुले आहेत.

मयत तिघे व बचावलेले दोघे असे पाचही जण येथील फ.ज.पाटील उच्य माध्यमिक विद्यालयातील बारावीचे विद्यार्थी असून ते एकमेकांचे जिवलग मित्र होते.

मयताना म्हसावद ग्रामीण रूग्णालयातून शवविच्छेदनासाठी शहादा पालिकेच्या ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यापैकी जयेश व चेतन यांचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.

रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुषारचा अंत्यविधी उद्या दि.10 रोजी सकाळी केला जाणार आहे. म्हसावद पोलिसात ललीत पाटील यांच्या खबरीवरून अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनी राकेश चौधरी व उपनिरीक्षक कृष्णा दाभाडे करीत आहेत.

दरम्यान, मयत विद्यार्थ्यांचे मृतदेह पालिका रूग्णालयात आणल्यानंतर शहादा एज्युकेशन संस्थेचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, नगरसेवक संदिप पाटील, नाना निकुंभे, संजय साठे, रियाज कुरेशी, ज्ञानेश्वर चौधरी, संतोष वाल्हे, महाविद्यालयाचे छोटु पाटील व शिक्षकांनी धाव घेतली.

 

 

LEAVE A REPLY

*