संशयीत मुलांना लपवून ठेवल्याप्रकरणी जि.प.बांधकाम सभापतींविरुद्ध गुन्हा

0
नंदुरबार । दि.9 । प्रतिनिधी-येथील राज ठाकरे खूनप्रकरणी जामिन रद्द झालेल्या दोघा अल्पवयीन मुलांना अज्ञातस्थळी लपवून ठेवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्तू भिला चौरे व दिलीप फत्तेसिंग गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एकलव्य नगरामधील राहणारे प्राथमिक शिक्षक नंदकिशोर भिकन ठाकरे यांचा मुलगा राज नंदकिशोर ठाकरे (15) याचे दि. 7 जुलै रोजी अपहरण करुन खून झाल्याची घटना घडली होती.

पोलीसांनी याबाबत चोवीस तासाच्या आत तपास करुन दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. परंतू बाल न्यायालयाने त्यांना त्याच दिवशी जामिन मंजूर केला होता.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून या निर्णयाविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात अपिल दाखल केली असता या न्यायालयाने दि. 5 ऑगस्ट रोजी दोघा अल्पवयीन मुलांचा जामिन रद्द करुन त्यांना पुन्हा बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, या विधी संघर्ष बालकांचा जामिन रद्द झाल्याने त्यांना धुळे येथील बालसुधारगृहात हजर करावयाचे होते, परंतू शहरातील कोकणीहिल परिसरात राहणारे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्तू भिला चौरे व दिलीप फत्तेसिंग गोसावी यांनी दोन्ही विधी संघर्ष बालकांना अज्ञातस्थळी लपवून आश्रय दिला म्हणून त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 212 प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*