गुटखातस्करांचे संपुर्ण उत्तर महाराष्ट्रात जाळे

0
नंदुरबार । दि.07 । प्रतिनिधी-दैनिक देशदूतमध्ये गेल्या आठवडयात जिल्हयातील गुटखा तस्करीबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखमालेची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून काल रात्री सुमारे दीड लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, नंदुरबारातील गुटखातस्करांचे संपुर्ण उत्तर महाराष्ट्रात जाळे असून नंदुरबार, शिरपूर, धुळे, जळगाव व नाशिक जिल्हयातील मालेगाव, सटाणापर्यंत दररोज गुटख्याची तस्करी करत आहे. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई होत नसून अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्षच आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने काही वर्षापासून राज्यात गुटखा विक्रीस बंदी केली आहे. परंतू शेजारच्या गुजरात राज्यात गुटखा बंदी नाही.

त्यामुळे गुजरात राज्यातून दररोज कोटयावधी रुपयांच्या गुटख्याची नंदुरबारात विक्री होत आहे. म्हणूनच नंदुरबार शहरासह जिल्हयात, धुळे, जळगाव, नाशिक जिल्हयात या गुटख्याची तस्करी केली जाते.

विशेष म्हणजे गुटख्याची विक्री ही दुप्पट, तिप्पट किमतीने होत आहे. नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले तीन गुटखा किंग हे संपुर्ण उत्तर महाराष्ट्राला गुटख्याचा पुरवठा करत आहेत.

नंदुरबार शहरापासून पंधरा कि.मी. अंतरावर असलेल्या निझर व उभद येथे या गुटखा किंगांचे तीन ते चार मोठमोठे गोडावून आहेत. याठिकाणी गुजरात राज्यातून येणारा गुटखा साठवला जातो.

त्यामुळे गुटख्याची वाहतूक करणे अत्यंत सोपे होत आहे. या गोडावूनमधून दररोज मध्यरात्री 90 लाख ते 1 कोटी रुपयांच्या गुटख्याची नंदुरबार शहरासह जिल्हयात होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्रात बंदी असतांना हे गुटखाकिंग सर्रासपणे कोटयावधी रुपयांचा गुटखा नंदुरबारात विक्री करताच कसे? या गुटखाकिंगांचे ‘वर’पर्यंत ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्यामुळे दररोज कोटयावधी रुपयांचा गुटखा विक्री होत आहे. या गुटखा किंगांकडून पोलीसांसह अन्न व औषधी प्रशासनालाही खुष ठेवले जाते.

नंदुरबार शहरासह पूर्ण जिल्हा, धुळे जिल्हयातील धुळे, शिरपूर, साक्री, दोंडाईचा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हयातील सटाणा, बागलाण, तहाराबाद आदी ठिकाणी या गुटख्याची तस्करी केली जाते.

गुजरात राज्यातील गोडावूनमधून दररोज टेम्पो, रिक्षा, बोलेरो, मोटरसायकल अशा वाहनांमधन गुटख्याचा पुरवठा होतो. याशिवाय महाराष्ट्र व गुजरात राज्य महामंडळाच्या बसेसमधून गुटख्याची तस्करी केली जाते. मात्र, नंदुरबारस्थित या गुटखा किंगांचे हात ‘वर’पर्यंत असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

अन्न व औषधी प्रशासन विभागाला याबाबतची पुर्ण माहिती असतांना त्यांच्याकडूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. या विभागाचे कार्यालय हे धुळे येथे आहे.

नंदुरबारातही हे कार्यालय आहे, परंतू तेथे कोणीही कर्मचारी उपस्थित नसतात. परंतू या विभागाच्या आशीर्वादानेच गुटख्याचा हा व्यवसाय महाराष्ट्रात सर्रासपणे सुरु असल्याचे यावरुन दिसून येत आहे.

जवळपास प्रत्येक टपरीवर गुटखा विक्री केली जाते. या टपरीवाल्यांची चौकशी केली तर ते गुटखा कोणाकडून घेतात याची माहिती या विभागाला मिळू शकणार आहे.

परंतू पोलीस व अन्न-औषधी प्रशासनाला दरमहा खुष केले जात असल्याने कोणतीही चौकशी होत नाही किंवा कारवाई केली जात नाही.

याबाबत दैनिक देशदूतमध्ये दि. 31 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान लेखमाला प्रकाशित करण्यात आली होती. त्या लेखमालेची दखल पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांच्या आदेशावरून अवैध मद्य, गुटखा व जनावरांची वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

काल रात्री करणखेडा चेक पोस्टजवळ उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर असतांना इंडिका कार क्र.एम.एच.04/जी.जे.7432 ही कार चेकपोस्टवर आली असता कारचालक कैलास बाबुलाल सोनवणे रा.नेर ता.जि.धुळे याने पोलीसांना पाहून इंडिकासह पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पो.कॉ.गावीत, पो.कॉ.नाईक यांनी त्याचा पाठलाग करत त्यास पकडले. या इंडिका वाहनात विमल गुटखा व त्यासोबत असलेल्या गुटखाच्या 31 बॅग सुपर फोरचेरमधील गोणींमध्ये पॅक केलेला आढळून आला.

गुटख्याची किंमत 1 लाख 42 हजार असून गाडीची किंमत दीड लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई तालुका पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर, उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बच्छाव, एएसआय काटकर, पो.कॉ.गावीत, नाईक, पो.कॉ.कपिल यांनी केली.

दैनिक देशदूतने प्रकाशित केलेल्या वृत्तमालीकेची दखल पोलीस प्रशासनाने घेतल्याने या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*