आदिवासी गौरव दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

0
नंदुरबार । दि.07 । प्रतिनिधी-दि.9 ऑगस्ट रोजी आदिवासी गौरव दिनानिमित्त नंदुरबार येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नंदुरबार येथे रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून रॅली काढण्यात येणार असून 12.30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा होणार आहे.
या सभेचे प्रमुख वक्ते म्हणून आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक मानसिंगभाई गरासीया रा. बान्सवाडा (उदयपूर,राजस्थान) हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आदिवासी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भरत वळवी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

सकाळी 10 वाजता सुरूवात महाराणा प्रताप चौकातून होणार असून बसस्थानक, नेहरू पुतळा, हाटदरवाजा, अहिल्याबाई विहिर, शिरीषकुमार स्मारक, शास्त्री मार्केट, नगरपालिका, अंधारे चौक, महाराणा प्रताप चौक, मार्केट कमेटी या मार्गाने रॅली जाणार असून आदिवासी बंधू भगिनींनी पारंपारीक वेशभुषेत पारंपारीक वाद्यांसह रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात आदिवासी महासंघ, महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन, भिल्लीस्थान टायगर सेना, आदिवासी एकलव्य संघटना, कोकणा कोकणी महासंघ, डोंगर्‍यादेव माऊली संघर्ष समिती, सितमाऊली परिवार, आपकी जय परिवार व विविध आदिवासी संघटना सहभागी होणार आहे.

या रॅलीनंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रॅलीचे रुपांतर जाहीर सभेत होणार आहे. या जाहीर सभेत राजस्थान येथील आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक मानसिंग गारासीया मार्गदर्शन करणार आहेत.

या सभेत प्रामुख्याने पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी, आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सप्टेंबर महिन्याचा आत मंजूर करावी, वस्तीगृहातील प्रवेश प्रक्रिया निकालानंतर 15 दिवसाचा आत सुरू करावी, विलंब झाल्यास जबाबदार प्रकल्प अधिकार्‍यावर कारवाई करण्यात यावी, आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे रिक्त पदे पेसा कायद्याअंतर्गत भरती करावीत, शासकीय आश्रमशाळा वस्तीगृहे यांचे इमारत बांधकाम व इमारत दुरूस्ती तत्काळ करण्यात यावी, महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय व अल्पसंख्यांक संस्थांमध्ये भरतीप्रक्रियेतील कंत्राटी पध्दत बंद करून रोष्टर पध्दतीने भरती करावी, आदिवासी विकास विभागातील एक हजार कोटी शेतकर्‍यांच्या कर्जमाफी करीता वर्ग केल्यास महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी शेतकर्‍यांचया 7/12 कोर्‍या करण्यात यावा.

विश्व आदिवासी दिवस संपूर्ण देशात शासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा, सुप्रिम कोर्टाचा निर्णयानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयातील बोगस आदिवासींना तात्काळ बडतर्ड करावे, पाच व सहावी अनुसूची 68 वर्षानंतरसुध्दा प्रभावीपणे राबविण्यात येत नाही.

त्याची अंमलबजावणी विनाविलंब सुरू व्हावी, घटना समितीत सदस्य जयपालसिंह मुंडा यांना भारतरत्न देण्यात यावे. आदी मागण्यांबाबत विचार विनीमय करण्यात येणार आहे.

यावेळी समाज बांधवांना उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी डॉ.राजेश वळवी, बी.ई.वसावे, विरेंद्र वळवी, डॉ.सुनील गावीत, अशोक अहिरे, वासुदेव गांगुर्डे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*