तातडीच्या 10 हजाराच्या कर्जासाठी बँकांकडे अर्ज करावे

0
नंदुरबार । दि.19 । प्रतिनिधी-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत शासनाच्या 14 जून व 28 जून च्या शासन निर्णयाप्रमाणे कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे.
या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांना बि-बियाणे व खते, औषधे खरेदी करण्यासाठी बँकांनी तातडीचे 10 हजार रुपयाचे पीक कर्ज शेतकर्‍यांना वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बँकांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजीत बँक अधिकार्‍यांच्या सभेत ते बोलत होते. पुढे बोलतांना डॉ.कलशेट्टी म्हणाले की, दि.14 जुलै च्या शासन निर्णयाची प्रत्येक बँकेने अंमलबजावणी करण्यात यावी.
त्या अनुषंगाने 10 हजाराच्या तातडीच्या पीक कर्जासाठी शेतकर्‍यांनी बँकांकडे अर्ज आणि स्वयं घोषणापत्र सादर करून संबंधित बँकांकडून लाभ मिळवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी यांनी केले.

हे तातडीचे 10 हजाराचे कर्ज वाटप करतांना जे पात्र शेतकरी 30 जून पर्यंत थकबाकीदार आहेत. अशा शेतकर्‍यांना शासन हमीवर सदर तातडीचे पीक कर्ज मिळणार आहे.

अशा पात्र शेतकर्‍यांना दि.31 ऑगस्ट पर्यंतची तातडीचे पीक कर्ज वाटपाची मुदत वाढविण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी घ्यावा.

या शासन निर्णयाची प्रत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व बँकांना देण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सहकार विभाग, राष्ट्रीकृत बँका, व्यापारी बँका, खाजगी बँकां यांना देण्यात आले.

शासन निर्णयातील निकषाप्रमाणे बँकांनी वेळेत कार्यवाही करणे आवश्यक आहे. या संबंधी अडचणी असल्यास त्या मांडाव्यात आणि जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये.

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांची अद्ययावत माहिती शाखानिहाय सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी बँकांच्या अधिकार्‍यांना यावेळी दिल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एस. धामणकर, जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी, नाबार्डचे डी.डी.एम. राजेश चांदेकर, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी डी.बी. पवार, संजय देशपांडे, विशाल तेलंग, संदीप वळवी, के.बी. पानपाटील, एम.ए. गायकवाड, कुमार गौरव, सचिन शिंदे, बी.आर. भोई, टी.के. गावीत, बी.टी. लिंगायत आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*