जिल्हा वार्षिक योजनेसाठी कालबद्ध नियोजन करा !

0
नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी-जिल्हा वार्षिक योजना 2017- 2018 चा नियतव्यय वेळेत खर्च होण्यासाठी प्रशासकीय मान्यतेसह विविध प्रक्रिया वेळेत पार पडण्यासाठी कालबध्द कार्यक्रमाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी येथे दिले.
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आज सकाळी बिरसा मुंडा नियोजन सभागृहात झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, खासदार डॉ. हीना गावित, माजी मंत्री तथा आमदार सुरुपसिंग नाईक, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुंवशी, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेत 2017-2018 करीता 67.34 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. आदिवासी उपयोजना (टीएसपी) करीता प्राप्त तरतूद 45024.58 लक्ष रुपये आहे.

तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील (ओटीएसपी) करीता प्राप्त तरतूद 625.70 लक्ष रुपये आहे. मंजूर होणारा नियतव्यय वेळेत खर्च होईल, अशी दक्षता प्रत्येक विभागप्रमुखाने घेतली पाहिजे.

2017- 2018 या आर्थिक वर्षातील नियोजित नियतव्ययाच्या खर्चासाठी कालबध्द नियोजनाची प्रक्रिया पार पाडावी. त्यासाठी तत्काळ सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत.

20 सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय मान्यतेसह विविध प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबरच्या सुरवातीला कामांना सुरवात होईल.

जानेवारी 2018 अखेरपर्यंत कामे पूर्ण करीत फेब्रुवारी 2018 अखेरपर्यंत सर्व उपक्रमांचे लोकार्पण होईल, असे नियोजन केले पाहिजे, असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.

जिल्हा वार्षिक योजना 2016- 2017 अंतर्गत आदिवासी उपयोजना व आदिवासी योजना क्षेत्राबाहेरील कामासाठी (ओटीएसपी) एकूण रुपये 642.07 लक्ष निधी मंजूर झालेला होता.

त्यापैकी रुपये 163.54 लक्ष निधी खर्च झालेला आहे. खर्चाची टक्केवारी 95.60 टक्के आहे. जिल्हा वार्षिक योजना 2016-2017 अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनासाठी एकूण रुपये 950.88 लक्ष निधी मंजूर झालेला होता.

त्यापैकी रुपये 950.88 लक्ष निधी खर्च झालेला आहे. खर्चाची टक्केवारी 100.00 टक्के आहे. जिल्हा वार्षिक योजना 2016-2017 अंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी एकूण रुपये 7640 लक्ष निधी मंजूर झालेला होता.

त्यापैकी रुपये 7625.55 लक्ष निधी खर्च झालेला आहे. खर्चाची टक्केवारी 99.81 टक्के आहे. आदिवासी उपयोजना (टीएसपी) 42359.43 लक्ष रुपये प्राप्त तरतूद होती. त्यापैकी 42085.97 लक्ष रुपये खर्च झाले.

खर्चाची टक्केवारी 99.36 टक्के आहे, असेही यावेळी सांगितले. पालकमंत्री श्री.रावल म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावेत.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विभागप्रमुखांनी नियोजन करावे. यावेळी जलयुक्त शिवार अभियान, शिक्षण, आरोग्य, वीज आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*