दहशतीमुळे शहाद्यात अघोषीत संचारबंदीसदृश्य वातावरण : आरोपींच्या अटकेच्या आश्‍वासनानंतर अत्यंसंस्कार

0
शहादा| ता.प्र. : येथील गरीब नवाज कॉलनीत काल नगरसेवक सद्दाम तेली यांच्या हत्येनंतर आज दुसर्‍या दिवशीही शहरात जाळपोळ व दगडफेकीच्या घटना सुरुच होत्या. त्यामुळे आजही शहरात तणावाचे वातावरण होते.
शहरातील व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवल्याने तसेच दहशतीमुळे शहरात अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. दरम्यान, आज मयत तेली यांचा मृतदेह धुळयाहून सकाळी शहाद्यात आणण्यात आला.

परंतू एमआयएमचे औरंगाबादचे आ.इमतियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनेतील दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतला. पोलीस अधीक्षकांनी सर्व दोषींना अटक करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास पालिकेतर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असतांना पाणी भरण्यावरून माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविकेच्या मुलांमध्ये बाचाबाची झाली.

या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यात दोन जण जखमी झाले. या जखमी व्यक्तीला पाहण्यासाठी पालिकेचे विद्यमान बांधकाम सभापती सद्दाम सलिम तेली हे रूग्णालयात गेले असता त्यांच्या पाठीमागून येवून त्यांच्यावर धारदार तलवारीने वार करण्यात आल्याने ते मयत झाले.

त्यानंतर संतप्त समाजबांधवांनी दगडफेक करुन, दुकाने, वाहनांची जाळपोळ सुरु केली. यात चार पोलीसांची वाहने, दोन वाहने, दोन मोटरसायकली, तीन दुकानांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे शहादा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, आज मयत सद्दाम तेलीचा मृतदेह सकाळी १०.३० वाजता धुळे येथून शहादा येथे आणण्यात आला. यावेळी औरंगाबादचे एमआयएमचे आ.इमतियाज जलील, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सैय्यद मोईन, औरंगाबादा महापालिकेचे विरोधी पक्षनेते फिरोज खान आदी उपस्थित होते.

त्यांनी दोषींना अटक होवून कारवाई होत नाही तोपर्यंत मयतावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा पवित्रा घेतला. परंतू पोलीसांनी कारवाई सुरु केली असून एकाही दोषीला सोडण्यात येईल, असे आश्‍वासन पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी दिल्याने दुपारी ४ वाजता मयत तेलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, आज दुसर्‍या दिवशी पुन्हा तेली समर्थकांनी मुख्तार शेख व त्यांच्या कुटूंबातील अनेकांची घरे, व्यापारी प्रतिष्ठाने जाळण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे.

अनेक घरांनाही आगी लावण्यात आल्या आहेत. त्यांच्या घरांमध्येही लुटमार सुरु आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

धुळे, जळगाव येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. त्यामुळे शहरात अघोषित संचारबंदी लागू झाली आहे.

LEAVE A REPLY

*