व्यापार्‍यांची लूट करणारी टोळी सक्रीय

0
मोदलपाडा / परिसरातील व्यापार्‍याला बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर चौघांनी लुटल्याची घटना गुजरात हद्दीत घडली.
वारंवार होणार्‍या या घटनांमुळे रस्तालुट करणारी टोळी सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
महाराष्ट्र सिमेपासून काही अंतरावर घडणार्‍या या घटनेतील रक्कमेची लूट झालेले व्यापारी गुजरात राज्यात उगाच हेलपाटे मारावे लागतील या भितीने फिर्याद देण्यासाठी पुढे येत नसल्याने लुटारूंच्या कारवाया वाढत चालल्या आहेत.
रोख रक्कम घेऊन जाणार्‍या व्यापार्‍यांची माहिती मिळवून त्यांचा माग काढत लूटारू फिरत असल्याने तळोदा, अक्कलकुवा व धडगांव येथून परतणार्‍या व्यापार्‍यांकडून चिंता व्यक्त होत आहे.

धावत्या वाहनाला हात देवून मदत मागण्याच्या बहाण्याने रस्ता अडवून हे लूटीचे प्रकार घडत आहेत. सिनेस्टाईल लूटीच्या घटना थांबविण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा आहे.

शनिवारी सायंकाळी तळोदा येथून शरदचंद्र रमेश पाटील रा.टोकरतलाव ता.नंदुरबार हे आपल्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.24, ए.एफ.0428) ने नंदुरबारकडे जाण्यासाठी निघाले होते.

रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन सद्गव्हाण पुलाखाली तयार केलेल्या कच्च्या रस्त्याकडे वळले असता एका व्यक्तीने हात देवून वाहन थांबवले.

पुलाचे काम सुरू असल्याने गरजू कामगार असेल म्हणून पाटील यांनी वाहन थांबवले. त्यांनी वाहन थांबवताच एकाने त्यांना हत्याराचा धाक दाखवून गाडी अनलॉक करण्यास सांगितले.

तर दुसर्‍याने गाडी उघडताच आत कापडी पिशवीत ठेवलेले एक लाख 56 हजार 600 रूपये ताब्यात घेतले तर इतर दोघांनी गाडीवर दगडफेक केली.

समोरून येणारी वाहने थांबत असल्याचे पाहून चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. समोरून येणार्‍या एका ट्रकचालकाला हा प्रकार ध्यानात आल्याने त्याने हॉर्न देवून मागून येणार्‍या वाहनचालकांना सावध केले.

चौघा दरोडेखोरांकडे विविध प्रकारचे हत्यार असल्याचे तसेच ते अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यालगत शेतांकडे पळाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले.

तसेच नंदुरबार व शहादा शहरातील बहुतांश व्यापार्‍यांचे तळोदा, अक्कलकुवा आणि धडगांव येथे व्यवसाय आहेत. दिवसभरात झालेल्या व्यवसायाची रक्कम घेवून त्यांचे कर्मचारी, व्यवस्थापक, मुले विविध वाहनांनी नंदुरबारकडे निघतात.

नंदुरबार किंवा शहाद्याकडे जातांना गुजरात हद्दीतून जावे लागते. नेमकी हीच बाब काही दरोडेखोरांच्या टोळक्यांनी हेरली असून गेल्या काही दिवसात गुजरात हद्दीतील लुटीच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

नंदुरबार शहरातील एका सिंधी व्यापार्‍यासही 14 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास गुजरात राज्यातील रायगड गावाजवळ उच्छल ते वेलदा टाकी रस्त्यावर चौघांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती.

त्यांच्याकडून लूटण्यात आलेली रक्कम ही साधारण एक लाखांच्या घरात आहे. हा व्यापारी गुजरात राज्यातून वसुली करून धानोरा ता.नंदुरबार येथे येत असतांना मध्येच वाहन अडवून ही लूट झाली आहे. उच्छल हद्दीतही केल्या आठवड्यात महाराष्ट्रातील दोघा मोटरसायकलस्वारांची झडती चौघांनीच घेतल्याची माहिती आहे.

घडलेल्या या प्रकाराची माहिती कुकरमुंडा तालुक्यातील निंभोरा येथील ग्रामस्थांना कळल्यानंतर ग्रामस्थ धावून आले. निंभोरा गावाचे उपसरपंच युवराज मराठे यांनी निझर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.एम. साधू यांच्यासोबत संपर्क करून संबंधीत लूटीची घटना कळवली होती.

शनिवारी रात्री उशीरापर्यंत शरदचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध दरोडा टाकून लूट केल्याचा गुन्हा निझर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. चौघेही दरोडेखोर हे हिंदीतून बोलत असल्याची माहिती आहे.

हे दरोडेखोर मध्यप्रदेश व महाराष्ट्र सिमेवरच्या गावांमधील असल्याचा कयास निझर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांचा असून त्यादृष्टीने तपास पथक रवाना केल्याची माहिती देण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्रीही याच प्रकारची घटना घडल्याची माहिती देण्यात आली होती. 14 ते 21 मे या काळात पिसावर ते सदगव्हाण चाररस्ता ते नंदुरबार या मार्गावर अज्ञात वाहनातून चौघे जण फिरत असल्याचे या मार्गावरून ये-जा करणार्‍या खाजगी प्रवासी वाहनचालकांचे म्हणणे आहे.

रस्त्याने ये-जा करणार्‍या या वाहनात दगडांसह विविध हत्यारे असल्याची माहिती देण्यात आली आहे. व्यापार्‍यांच्या लूटीच्या या घटनांमुळे नंदुरबार व शहादा परिसरातील व्यापारी भयभीत झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

*