कुसूमवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

0
शहादा । दि.26 । ता.प्र.-तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या कुसूमवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधांचा अभाव असून इमारतीची दुर्दशा आहे. तसेच अपुर्ण कर्मचारी वर्गामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
परिसरातील भुतेआकसपूर, चिरडे, नांदिया, कन्साई, नवागांव, चिंचोरा, मडकानी, फत्तेपूर, रामपूत, कुढावद, पिंपळोद, औरंगपूर, लाछोरा, शिरूड उमर्टी, आमोदा, तलावडी, पिंप्राणी, वीरपूर, दरा, जावदा, चिखली कानडी, जूनी पिंप्राणीसह कुसूमवाडा-कन्साई परिसरातील 10 ते 15 पाड्यांचा समावेश कुसूमवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आहे. सुमारे 45 हजार लोकसंख्येसाठी असलेल्या प्राथमिक केंद्रात सद्यस्थितीत विविध समस्या असून संबंधितांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आरोग्य सुविधेपासून वंचित आहेत.

या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सध्या 1 वैद्यकीय अधिकारी, 1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 1 परिचारिका, 1 कंत्राटी परिचारिका, 2 आरोग्य सेवक, 2 शिपाई एवढाच कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. वास्तविक याठिकाणी वैद्यकीय अधिकारी वर्ग 1, कंपाऊंडर, लेखानिक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, शिपाई, वाहनचालक आदींची लोकसंख्येच्या तुलनेत नियुक्ती होणे आवश्यक आहे.

मात्र प्रत्यक्ष माहिती घेतल्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी अ वर्ग पदरिक्त असून लेखनिक प्रतिनियुक्तीवर नाशिक आयुक्त कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. इतर कर्मचार्‍यांनी नियुक्ती झाली नसल्याने आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही.

उपचारासाठी दाखल होणार्‍या परिसरातील सुमारे 26 गावांतील रुग्णांना येथून उपचाराविना परतावे लागत असल्याचे दुर्दैव आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, कुपोषित बालकांवर उपचार, गरोदर मातांवर उपचार, विविध साथीच्या आजारांवरील उपचारासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या आशेने येतात.

मात्र, पुरेशा कर्मचारी वर्गाअभावी रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होतात. याबीबीची गांभीर्याने दाखल घेणे आवश्यक आहे. कुपोषण निर्मूलनासाठी शासन उपाययोजना करत असले तरी विविध समस्येमुळे अडचणी येतात.

आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचारी निवासस्थाने पावसाळ्यात गळत असून इमारतीच्या दुर्दशेकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील ग्रामस्थांसह रुग्णांना योग्य त्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आपण संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*