पालकांनो ! पाल्याकडून अवाजवी अपेक्षा करु नका !-प्रा.डॉ.कदम

0
नंदुरबार । दि.27 । प्रतिनिधी-पालकांनी आपल्या पाल्याची आवड लक्षात घेवून त्याचे भविष्य घडवावे. पाल्याकडून अवाजवी अपेक्षा करु नका अन्यथा पदरी निराशा येईल, असे प्रतिपादन जी.टी.पी.महाविद्यालयाचे प्रा.डॉ.माधव कदम यांनी केले.
दरम्यान, नंदुरबार कलाल समाजातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गौरव यावेळी करण्यात आला.
नंदुरबार कलाल समाजातर्फे समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नंदनगरी सोसायटीत नुकताच आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी डॉ.कदम बोलत होते. डॉ.कदम पुढे म्हणाले, पालकांनी आपल्या पाल्यांना त्यांच्या भविष्याबाबत स्वतः निर्णय घेवू द्या. त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा करु नका.

शेजारच्या मुलाला 90 टक्के मिळाले म्हणून आपल्या मुलालाही तेवढे गुण मिळालेच पाहिजे, अशी चुक करु नका. कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीना काही सुप्त गुण असतात, ते गुण ओळखून त्या त्या क्षेत्रात त्याचे करीअर करु द्या, तरच तो यशस्वी होईल व तुमचीदेखील मान उंच होईल.

डॉ.कदम यांनी पुर्वीचे संस्कार व आताचे संस्कार याबाबत उहापोह केला. आईबाबाची जागा आता मॉम-डॅडने घेतली आहे. मात्र, आई या शब्दात जी ताकद आहे, जी ओढ आहे, जे प्रेम आहे ते मॉममध्ये निश्चितच नाही.

म्हणून पाश्चात्य संस्कृतीचा स्विकार करु नका. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देवू नका, त्याचा वापर घातक असून इंटरनेटवर सर्व गोष्टी आयत्या मिळत असल्याने नवीन पिढीची विचारशक्ती खुंटत चालली आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ.कदम यांनी फादर्स डे चे महत्व सांगून ‘श्यामची आई’ या पुस्तकातील एक गोष्ट त्यांनी एकपात्री प्रयोगाद्वारे सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.

यावेळी लक्ष्मी विलास जावरे, निकीता रुपेश गिरनार, दिव्या पंकज कलाल, प्रसाद अजय कलाल, भाग्यश्री किरण सोनवणे, हेमलता किरण सोनवणे या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रकाश कलाल, पंकज कलाल, राकेश कलाल, निश्चल गिरनार, केतन कलाल, विलास जावरे यांच्या हस्ते दप्तर व पुष्पगुच्छ गौरव करण्यात आला.

तर बँक ऑफ महाराष्ट्रचे सेवानिवृत्त व्यवस्थापक गजानन जावरे यांच्यातर्फे प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला पेन भेट देण्यात आली.

याप्रसंगी भारतीय लष्करातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले फौजी राजेश भिका गिरनार यांचा समाजाचे अध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.

यावेळी नितीन सोनवणे, गजानन जावरे, निश्चल गिरनार, रुपेश गिरनार यांनी मनोगत व्यक्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक व सुत्रसंचलन विजय कलाल यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.सोनाली रुपेश गिरनार यांनी केले. यावेळी सर्व समाजबांधव उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*