पालिका निवडणूकीसाठी भाजपा सज्ज

0

नंदुरबार । दि.07 । प्रतिनिधी-

तीनही नगरपालिका भाजपा स्वबळावर लढणार -खा.डॉ.हिना गावीत

जिल्ह्यातील तळोदा, नंदुरबार व नवापूर या तिनही नगरपालिका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढेल, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्षा खा.डॉ.हिना गावीत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

आज खा.डॉ.हिना गावीत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने जिल्ह्यात भारत संचार निगमने 100 टॉवर मंजूर केले असून त्याची सुची त्यांनी सादर केली.

यामध्ये धडगांव तालुक्यात 6, नंदुरबार शहरात 7, नंदुरबार तालुक्यात 3, नवापूर तालुक्यात 1, लोकसभा मतदार संघातील पिंपळनेर तालुक्यात 8, साकी तालुक्यात 5, शहादा तालुक्यात 7, शिरपूर तालुक्यात 19, तळोदा तालुक्यात 13 याप्रमाणे या टॉवर्स उभारणीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलतांना दिली.

केंद्रशासनाच्या उज्ज्वला गॅस योजनेचे वाटप जिल्ह्यात सर्वत्र सुरू करण्यात आले असून अद्यापपावेतो या योजनेबाबत कमी माहिती असल्याने मागणी येत नसल्याचे खा.डॉ.हिना गावीत यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत काही एजन्सी मालक योजनेच्या नावावर अधिक पैसे घेत असल्याची तक्रार लाभार्थ्यांनीच केलेली आहे. अशा 5 एजन्सी धारकांना नोटीसादेखील पाठविण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

निवडणूकांबाबत सध्या मोर्चेबांधणी करण्यात येत असून लवकरच याबाबत निश्चित भूमिका जाहीर करण्यात येईल. अद्यापपावेतो तीनही ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नंदुरबार नगरपालिका सध्या भाजपाच्या ताब्यात नसली तरीही हे सरकार पारदर्शी व भेदभाव न करणारे नसल्याने नंदुरबारच्या विकासासाठी आलेला पैसा हा भाजपाच्याच सरकारने पाठविलेला आहे.

त्यामुळे शहराच्या विकासात भाजपाचाही मोठा वाटा आहे. या बळावरच आगामी निवडणूका लढविल्या जातील असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

निवडणूका भाजपासाठी प्रतिष्ठेच्या -आ.उदेसिंग पाडवी

 

येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, नवापूर, नंदुरबार या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातलेल्या आहेत.

केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीचे शासन आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार व एक खासदार निवडून आलेले आहेत.

या सर्व राजकीय बाबी लक्षात घेता पुढे तिन्हीही नगरपालिका जिंकणे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे आहे. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीसुद्धा आता बदललेली आहे. त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो.

महाराष्ट्रात मागे झालेल्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणूका भारतीय जनता पार्टीने स्वःबळावर लढविलेल्या आहेत.

या सर्व निवडणूका जास्तीत-जास्त जिंकून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात 1 नंबरचा पक्ष झालेला आहे. भाजपा-शिवसेना युतीबाबत प्रदेशाकडून अद्यापपावेतो कुठल्याही प्रकारचे संकेत मिळालेले नाहीत.

युतीबाबत सकारात्मक भूमिका राहील असे वाटत नाही. एखाद्या वेळी स्थानिक राजकीयश् परिस्थिती पाहून युती करायची किंवा नाही याबाबत प्रदेशाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात युती करायची किंवा नाही याबाबतीत निर्णय जिल्हाध्यक्ष डॉ.हिना गावीत घेतील. निर्णय घेतांना दोन्ही आमदारांचे मत विचारात घेतले जाईल.

राजकीय परिस्थिती पाहता या तिन्ही नगरपालिका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढण्याची शक्यता वाटते आहे. प्रदेशाने आदेश दिल्यास आमची युतीबाबत सकारात्मक भूमिका राहील असे आ.उदेसिंग पाडवी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

*