अंगणवाडी सेविकांचा जि.प.वर मोर्चा

0
नंदुरबार । दि.01 । प्रतिनिधी-राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत कार्यरत सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढविण्याचे शासनाने वेळोवेळी आश्वासन दिलेले आहे.
परंतु आजतागायत शासनाने अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधन वाढीच्या निर्णयाबाबत काहीही कार्यवाही केलेली नाही. मागासलेल्या आसाम, त्रिपुरा राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांपेक्षा राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना कमी मानधन दिले जाते.

त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड चिड व असंतोष आहे. त्याच्या परिणामी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मानधनवाढीसह अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा लागू करण्यात यावा, अंगणवाडी कर्मचार्‍यांना मिळणार्‍या सेवा समाप्ती लाभामध्ये सुधारणा करून जास्त सेवा, जास्त लाभ याप्रमाणे समाप्ती लाभ देण्यात यावा.

मध्यवर्ती सरकारने दि.8 मार्च 2017 रोजी जाहीर केल्याप्रमाणे अंगणवाडीसेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना भविष्यनिर्वाह निधी लागू करण्यात यावा. अंगणवाडी कर्मचार्‍यांना इतर शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे आजारपणाची रजा तसेच उन्हाळी सुटी भरपगारी लागू करण्यात यावी, अंगणवाडी केंद्रांना पुरक पोषण आहार पुरविणार्‍या बचत गटांची थकीत बिले विनाविलंब अदा करून यापुढे दरमहा देण्यात यावा, मिनी अंगणवाडी केंद्रांसाठी सुधारीत घरभाडे लागू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

या आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत शासनाशी वेळोवेळी अनेकदा संघटनेचे चर्चा केलेली आहे. परंतु शासनाने अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या वरील मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी दि.17 जुलैपासून राज्यातील आपापल्या जिल्हा परिषदांवर संघटनेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे आणि संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

यावेळी कार्याध्यक्ष युवरजा बैसाणे व रामकृष्ण पाटील यांनी मार्गदर्शन करतांना अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास दि.4 ऑगस्ट रोजी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा काढतील.

तसेच सप्टेंबर महिन्यापासून अंगणवाडी केंद्र बंद करून बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आला आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी संघटक सचिव रविंद्र ब्राम्हणे, नयना मराठे, मोहिनी पाटील, यमुना पाटील, सोनल शिंदे, सुनिता कोकणी, इंदिरा पाडवी, चंद्रकला चव्हाण, लता गावीत, सुमिता शिंदे, विद्या मोरे, विजया वसावे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*