चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने सात्रळमधील सार्थकच्या गळ्यावर वार

0

विश्‍वास नांगरे यांनी दिली माहिती

पुणे(प्रतिनिधी) – लोणावळा परिसराला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे दुहेरी हत्याकांड 2 एप्रिल रोजी लोणावळा आयएनएस शिवाजी समोरील एस पॉइंट डोंगरावर घडले. सुमारे अडीच महिन्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर आले असून ही घटना कशी घडली हे स्वतः कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सलीम शेख (रा. लोणावळा) व असिफ शेख, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून किरकोळ पैशांसाठी खून केल्याचे त्यांनी कबूल केले आहे. सलीम हा लोणावळा परिसरातीलच असून असिफला आग्रा येथून अटक केली. यापैकी एका आरोपीला घटनेच्या दुसर्‍याच दिवशी पोलिसांनी अटक केली होती. मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो शिताफीने पळाला होता.
सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणारा अहमदनगर जिल्ह्यातील सात्रळचा सार्थक वाकचौरे व पुणे जिल्हातील श्रुती डुंबरे या दोघांचेही विवस्त्र मृतदेह लोणावळा आयएनएस शिवाजीसमोरील एस पॉइंट डोंगरावर आढळल्याने नागरिकांसह पोलीस खातेही हादरून गेले होते.

गेली दोन महिने कसून तपास करूनही पोलिसांना हाती ठोस पुरावा लागत नव्हता. तसेच श्रुती व सार्थक यांच्या पार्श्वभूमीतूनही धागेदोरे मिळत नव्हते. शेवटी पोलिसांनी गुन्हेगारी यादीवरील सर्व गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. 8 तपास पथकांनी घटनास्थळ व परिसर पिंजून काढला. खुनामागील वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मृत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली.
त्यात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी साक्षीदारांसाठी 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले. त्यावेळी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी खून होताना नाही मात्र त्यानंतर रक्त व कपडे साफ करताना पाहिल्याचे सांगितले. त्यावरून आरोपी हे सराईत व रेकॉर्डवरचे असल्याचे पोलिसांची खात्री पटली. त्यानुसार तपास चक्रे हालू लागली. संबंधित आरोपींना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन वेळा जबाब घेतला. यामध्ये तफावत जाणवल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतरच्या चौकशीत मात्र आरोपींनी खून केल्याचे मान्य केले.

असे घडले दुहेरी हत्याकांड..
दोन्ही आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर चोरी, घरफोडी, असे गुन्हे दाखल आहेत. लोणावळा परिसरात संध्याकाळ झाली की अंधारात बसलेल्या जोडप्यांना अज्ञातस्थळी नेऊन धमकावणे व त्यांना लुबाडणे हे त्यांचे नित्याचे काम होते. तसेच त्यांनी सार्थक व श्रुतीलाही नेले तेथे त्यांनी सार्थकला कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी श्रुतीलाही कपडे काढण्यास सांगितले. यावेळी सार्थक याने आरोपीच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने सार्थकच्या गळ्यावर वार केले व त्याचा खून केला. सार्थकवरचा हल्ला पाहून श्रुतीने आरडाओरड सुरू केली. तिचा आवाज थांबवण्यासाठी आरोपींनी सार्थकचाच शर्ट फाडून श्रुतीचा गळा आवळला व तिचाही खून केला. व त्याच शर्टने दोघांचेही हात पाय बांधले. पोलिसांनी आरोपींकडून दोन चोरीचे मोबाईलही जप्त केले आहेत. पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

*