बिबट्याने नव्हे, नवर्‍यानेच काढला काटा

0

हल्ल्याचा बनाव उघड प्रसाद आढाव विरोधात खुनाचा गुन्हा

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील मानोरी येथील सुनीता प्रसाद आढाव (वय-36) या विवाहितेचे लग्न होऊन 19 वर्ष झाले. मात्र, मूलबाळ होत नाही म्हणून तिचा पती प्रसाद आढाव याने तिच्या डोक्यात पाठीमागून टणक वस्तूने मारहाण केली. तिला गंभीर जखमी करून तिचा खून केला व खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह उसाच्या शेतात नेऊन टाकला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात पती विरोधात मृत सुनीताचा भाऊ संजय भाऊसाहेब आसने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नंबर 292/17 नुसार भादंवी कलम 302, 201 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना बुधवारी (दि. 09) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुनीताचा पती प्रसाद आढाव यास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले असून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे त्याची कसून चौकशी करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दरम्यान, प्रारंभी सुनीता हिच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा बनाव करण्यात आल्याची चर्चा झाली. मात्र, प्रत्यक्षात पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना समजताच घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी मानोरी येथे फौजफाट्यासह धाव घेतली. रात्री उशिरा अहमदनगर येथून श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचरण केले.

यावेळी न्यायवैद्यक पथकही घटनास्थळी आले होते. श्‍वानपथकाने रस्त्यालगत असलेल्या मंदिरापर्यंत माग काढला. तसेच घटनेच्या ठिकाणी जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारीही दाखल झाले होते. आरोपीने प्रारंभी मृत महिलेच्या जवळ महिलेचे अंतर्वस्र टाकून तिच्यावर अत्याचार झाल्याचा बनाव करून पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तर बिबट्याने हल्ला केल्याचाही बनाव करण्यात आला होता. मात्र, अवघ्या काही तासातच या खुनाला वाचा फुुटली असल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सुनीता ही गायांना व शेळ्यांना गवत आणण्यासाठी आपल्या घराजवळील 200 फूट अंतरावरील शेतात गेली होती. मात्र, तेथेच तिचा खून झाल्याची घटना घडली. सुनिताने बचावासाठी प्रयत्न केल्याचे घटनेच्या ठिकाणी दिसून आले. रात्री उशिरापर्यंत पतीला ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक वाघ यांनी सांगितले. त्याच्यासह एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

सुनीताचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताना तिच्या गळ्यात सोन्याचे गंठण होते. मात्र, रूग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला असता ते गंठण रहस्यमयरीत्या गायब झाल्याने ते गेले कोठे? याची चर्चा नातेवाईकांमधे चालू होती. दरम्यान, यापूर्वीही अशा घटनेत किंवा अपघातातील गंभीर जखमी व मृतदेहाच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब झाल्याच्या घटना घडल्या असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात सुरू होती.

 

LEAVE A REPLY

*