केकताई खून प्रकरण ; साधूचा खून करणारा श्रीरामपुरातला

0

माहिती देणार्‍यास 50 हजारांचे इनाम, रेखाचित्र जारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील केकताई येथील आश्रमात एका साधूचा व भक्ताच्या खून प्रकरणातील आरोपी श्रीरामपूर मधील शिंदे नामक व्यक्ती असल्याचा संशय आहे. त्याचे रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आले असून योग्य माहिती देणार्‍यास 50 हजार रुपयांचे इमान देण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अ‍ॅड. विनोद चव्हाण यांनी दिली.
गेल्या 12 जुलै रोजी वडगाव गुप्ता येथील केकताई आश्रमात सुदाम नामदेव बांगर (रा. वडगाव गुप्ता) व बाबासाहेब बाबूराव कराळे (रा. शेंडी) यांची हत्या करण्यात आली होती. हा आश्रम घनदाट जंगलात असल्यामुळे तेथे कोणी फिरकत नाही. याचाच फायदा घेत आरोपींनी दोघांना ठार मारले. त्यांचा शोध घेताना पोलिसांनी अनेक तंत्रांचा वापर केला. मात्र, अद्याप यश आले नाही. याच आश्रमातून एक घोडी गायब करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या तपासामुळे ही घोडी अचानक पुन्हा आश्रमात आणून सोडण्यात आली.
खून करणारा आरोपी हा मृतांच्या जवळचा असल्याच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. मात्र त्याची ओळख पटण्यात मोठी पराकष्ठा होत आहे. आरोपी हा श्रीरामपूर भागातील असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. हा आरोपी चलाख नसला तरी संधिसाधू असल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.
त्यामुळे संशयीत म्हणून पोलिसांच्या रडारवर असणार्‍या शिंदेची माहिती देणार्‍या व्यक्तीस 50 हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. तसेच माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे पत्रक एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी विनोद चव्हाण यांनी काढले आहे. जर या व्यक्तीबाबत काही माहिती असेल तर त्वरित जवळचे पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष किंवा एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*