मुंबई पोलिसांकडून बँक अधिकार्‍यास अटक ; आदिवासी महामंडळ 10 कोटी 2 लाखांचे प्रकरण

0

नाशिक : आदिवासी विकास महामंडळाच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून विभागाची शासकीय बँकेच्या खात्यात असलेली सुमारे 10 कोटी 2 लाख रुपयांची ठेव परस्पर दुसर्‍या बँकेत वर्ग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नाशिक येथील राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकार्‍यास अटक केली. टी. एम. किशोर असे या अधिकार्‍याचे नाव असून ते आंध्र बँकेत कार्यरत आहे.

मुंबई येथील संशयित प्रवीण शिवगण याने आदिवासी विकास महामंडळाचे बनावट लेटर हेड आणि कागदपत्रे बनवून नरीमन पॉईंट येथील नामांकित राष्ट्रीयकृत बँकेत विभागाचे खाते उघडले आणि याच खात्याचा आधार घेत नाशिक येथील राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यात आदिवासी विकास मंडळाची असलेली 10 कोटी 2 लाख रुपयांच्या ठेवी या खात्यात वर्ग करून घेतल्या.

मात्र मुंबई पोलिसांना यात संशय आल्याने त्यांनी संशयित प्रवीण शिवगण यास ताब्यात घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात अदिवासी विकास महामंडळाचे उपसंचालक अवताडे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अधिक सखोल तपास करताना या सर्व प्रकारामध्ये बँक अधिकार्‍याचा संशय आल्याने सोमवारी मुंबई पोलीस पथकाने नाशिक येथील आंध्र बँकेचे अधिकारी टी. एम. किशोर यांना अटक केली. या प्रकरणात विभागाच्या कुणा अधिकार्‍यांचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात असून या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती मंत्रालयात विभागामार्फत पुरवली जात आहे.

आदिवासी विकास महामंडळाची ठेव ही परस्पर वर्ग करण्याचा डाव उधळल्यानंतर या प्रकरणी विभागाच्या अधिकार्‍यांकडून मौन पाळण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*