मुंबईत मराठ्यांचा महासागर!

0

विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र; बहुतांश मागण्या मान्य, मोर्चातून शेवटचा इशारा

मुंबई – ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा शब्दश: खरी ठरवत देशभरातील तमाम मराठा बांधवांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासह कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा आणि विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या ऐतिहासिक मोर्चाचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले.
सर्व पक्षांचे आमदार राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या मोर्चाच्या समर्थनार्थ उभे राहिले. या भव्य मोर्चाची दखल घेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विशेष निवेदन करून समाजाच्या काही मागण्या केल्या. त्यानंतर खासदार संभाजीराजे भोसले यांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथे सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांची घोषणा मराठा जनसागरापुढे करण्यात आली आणि सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या मोर्चाची सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास सांगता झाली.
रणरागिणींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली. मोर्चाची समाप्ती होणार असलेल्या ठिकाणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मोर्चेकर्‍यांनी स्टेजपर्यंत जाण्यापासून रोखले. मोर्चे कसे असावेत, हे मराठा मोर्चाने जगाला दाखविले, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, आमदार भाई जगताप हज हाऊस येथून मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले.
तसेच नगर येथील भाजपाच्या आ. स्नेहलताताई कोल्हे, आ. मोनिकाताई राजळे, आ. संग्राम जगताप आदी सहभागी झाले होते. आझाद मैदानापासून ते चेंबूरपर्यंत मोर्चाची गर्दी होती. दरम्यान राजकीय नेते, आमदार व मंत्री यांना मोर्चेकरी सहभागी होऊन देत नसल्याने आझाद मैदान येथून काही आमदार विधानभवनात परतले.
मुस्लीम बांधवांच्या विविध संघटनांकडून मोर्चेकरांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना बिस्किट, पाणी, वडापाव, चिवडा वाटप करण्यात आले. त्याचवेळी महापालिकेतर्फे चार ठिकाणी वैद्यकीय सेवा केंद्रे पुरविण्यात आले. मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार भगवे फेटे घालून सभागृहात आले होते. विधानपरिषदेत धनंजय मुंडे आक्रमक झाले होते. तेथे सभागृहाचे कामकाज दुपारी तीनपर्यंत तहकूब करण्यात आले. तर, विधानसभेतही हीच परिस्थिती होती. इतरांच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तर, मराठा आरक्षणाबाबत सरकार विरोधी पक्षाला बोलू देत नाही, असा आरोप विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
बुधवारी पहाटेपासूनच राज्याच्या कानाकोपर्‍यांतून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईत प्रवेश करणार्‍या नाक्यांवर टोलवसुली बंद होती. काहींनी मंगळवारी रात्रीच मुंबई गाठली होती. सकाळी मुंबई महापालिका, सीएसटी स्टेशन बाहेर मोर्चेकर्‍यांनी गर्दी केली होती. हार्बर आणि सेंट्रल लाईनवरून पहाटेपासून मोर्चेकर्‍यांनी मुंबईत प्रवेश केला. मराठा मोर्चामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी झाली होती. मोर्चा आझाद मैदानावर समाप्त होणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक गर्दी होती.
केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर चेन्नई मेल, कोर्णाक एक्स्प्रेस, कन्याकुमारी, नंदीग्राम, अमृतसर, हावडा, हुसेनसागर, हावडा मेल या रेल्वे गाड्यांमधूनही मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते.
भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आंदोलकांनी रोखून धरला. त्यामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सायन महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. इस्टर्न एक्स्प्रेस फ्री वे वरही वाहतूक कोंडी होती आणि मुंबईकडे येणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
मोर्चासाठी 50 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिसांना मराठा बांधवांनीच पाणी आणि नाश्त्याचे वाटप केले. मुलुंड टोल नाका, मुंबईकडे येणारी वाहतूक कोंडी सोडविण्यात पोलिसांना यश आले. मुंबईतील वाहतूक कोंडी झाली, तरी मुंबई बाहेरील महामार्गांवर वाहतूक सुरळीत होती.
मोर्चाचं एक टोक आझाद मैदान तर दुसरं टोक भायखळा येथील जिजामाता उद्यानापर्यंत होतं. एक मराठा, लाख मराठा लिहिलेल्या भगव्या टोप्या, भगवे शेले, ‘जगदंब’ लिहिलेले टी शर्ट, शिवरायांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज घेऊन लहानापासून थोरांपर्यंत मराठा समाजाने मोर्चात सहभाग घेतला. अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धपणे हा मोर्चा पार पडला. मोर्चा आझाद मैदान येथे पोहोचल्यानंतर मोर्चाच्या अग्रभागी असलेल्या मुलींनीच व्यासपीठावरून विराट गर्दीला मार्गदर्शन केले. मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडत मराठा समाजाच्या मागण्यावर भाषणांतून जोर देण्यात आला. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर प्रसंगी आम्ही दिल्लीतही धडक देऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मराठा कार्यकर्त्यांकडून आझाद मैदानात येण्यास मज्जाव करण्यात आला. आधी आरक्षण द्या, त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी व्हा, अशी मागणी करत आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी आशिष शेलार यांना मैदानात येण्यास मज्जाव केला. आशिष शेलार यांनी मात्र ही बाब फेटाळून लावली आहे.
तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी भाजपाच्या आमदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असून मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील. आ. शेलारांबाबत तसा काही प्रकार घडलाच नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगावमधील मराठा बांधव मराठा मोर्चाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकले होते. कर्नाटक विधानसभेचे बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील मोर्चात सहभागी झाले होते. बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, मरेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल मे, अशा घोषणा सीमावासीयांकडून देण्यात येत होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या या घोषणांनी आझाद मैदानाचा परिसर दुमदुमला.

आरक्षण मिळायलाच हवे : पवार  – मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची नाही. आतापर्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणीही राजकारण करू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे, अशी आमची आधीपासूनची मागणी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. कोणतंही कारण नसताना आरक्षण द्यायला दिरंगाई नको. सरकारने लवकरात लवकर ठोस भूमिका घ्यावी. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढा पाठिंबा असताना सरकारचं घोडं अडलं कुठे? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

विधिमंडळात गोंधळ; राजदंड पळविण्याचा प्रयत्न – मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी, शेतमालाला हमीभाव, विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांसह अन्य मागण्यांसाठी मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघालेला असताना विधिमंडळात या मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले. मोर्चाला सुरुवात होताच भाजपचे आमदार मंत्रालयाजवळच्या आयनॉक्स थिएटरपासून घोषणाबाजी करीत सभागृहात दाखल झाले. विधानभवनाच्या पायर्‍यांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार समोरासमोर आले त्यावेळीही घोषणाबाजी झाली.  विधिमंडळात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. यावेळी राजदंड पळविण्याचा प्रयत्न झाला. सभापतींसमोरच्या मोकळया जागेत सर्वपक्षीय आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण जाहीर करावं ही मागणी करत विरोधकांनी विधानपरिषदेत गदारोळ केला त्यामुळे सदनाचं कामकाज सभापती रामराजे निंबाळकर यांनी 30 मिनिटांसाठी तहकूब केलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत हे सरकार आल्यापासून या विषयावर अनेकदा चर्चा झाली; मात्र आरक्षण मिळालं नाही त्यामुळे चर्चा नको आरक्षण द्या अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली. मोर्चात सहभागी व्हायचं असल्यामुळे आजचं कामकाज स्थगित करा अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी  लावून धरत विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केला. त्यामुळे कामकाज अर्धा तास स्थगित करण्यात आलं. दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना-भाजप सरकारवर टीका केली. शिवसेना-भाजपला मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. चर्चा रोखण्याची त्यांची भूमिका आहे असा आरोप त्यांनी केला. हवामानाप्रमाणे शिवसेनेची धोरणे बदलत असतात असे त्यांनी सांगितले. भाजपची भूमिका शेतकरी आणि आरक्षण विरोधी आहे. गेल्या अडीचवर्षांत आपण हे पाहिले आहे अशी टीका त्यांनी केली.

संभाजीराजे, राणेंना स्टेजवरच रोखलं! –  मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं मराठा मोर्चेकरी संतप्त झाले होते. आझाद मैदानात जमलेल्या लाखो मोर्चेकर्‍यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि काँग्रेस आ. नितेश राणे यांना घेराव घातला. मोर्चेकर्‍यांनी त्यांना व्यासपीठावरच रोखून धरले. आरक्षणाचं काय झालं? कर्जमाफीचं काय? अशा सवालांची सरबत्ती मोर्चेकर्‍यांनी त्यांच्यावर केली. जवळपास अर्धा तास ही परिस्थिती कायम होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर नेत्यांची यातून सुटका झाली. यामुळं आझाद मैदानात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तराचे राणेंकडून स्वागत, विरोधकांच्या भुवया उंचावल्या –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आरक्षण व इतर मागण्यांचे निवेदन घेऊन आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर विधानसभेत विविध घोषणा केल्या. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असमाधान व्यक्त करत आपली नाराजी दर्शवली. सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. एकीकडे सर्व विरोधक असमाधानी असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार सकारात्मक दिसतंय, आता त्यांच्याकडून कृतीची अपेक्षा आहे, असा सकारात्मक सूर त्यांनी लावला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. तुम्ही तज्ज्ञांना बोलावून न्यायालयात जा व मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी दिला. संपूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत असताना राणेंचा सूर मात्र सरकारला पाठिंबा देणारा होता. त्यामुळे राणेंच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मोर्चेकरांना सुनावले. मोर्चात येणारे काही लोक हे नकारात्मक विचारानेच येतात. परंतु, मुख्यमंत्र्यांचे उत्तर त्यांची पूर्तता करेल, असेही ते म्हणाले. कौशल्य विकासाबाबत मागील वेळीही सरकारने सांगितले होते. परंतु, त्यावर अजून काहीही झालेले नाही. पण मुख्यमंत्री पुढाकार घेतील, अशी आशा असल्याचे ते म्हणाले.

फेटे बांधून विरोधी आमदार मोर्चात सहभागी –  विधानभवनात मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून विधानभवनात जोरदार गदारोळ झाला. या गदारोळानंतर फेटे बांधून विरोधी पक्षाचे आमदार मोर्चात सहभागी झाले. विधानभवनातून विरोधक आझाद मैदानाकडे रवाना होत त्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला. विरोधकांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजीही केली. यावेळी सतेज पाटलांनी अजित पवारांना फेटा बांधला आणि मोर्चात सहभागी होत पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

*