आख्खी मुंबई ‘मराठा’मय : मराठा मोर्चासाठी नगरकरांचा लाखोंच्या संख्येने सहभाग

0
आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती, शेतकर्‍यांच्या 10 लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ, ओबीसींप्रमाणे
शैक्षणिक सवलती 

मुंबई – सकल मराठा समाजाच्या 58व्या आणि निर्णायक झंझावाती मूक मोर्चाचे वादळ अखेर काल बुधवारी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत येऊन धडकले. त्यामुळे अवघी मुंबापुरी ‘भगवा’मय झाली होती. हा मूक मोर्चा होता, पण त्याने मराठा समाजाच्या मागण्यांचा आवाज मात्र बुलंद केला. सर्व पक्षांचे आमदार राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या मोर्चाच्या समर्थनार्थ उभे राहिले.

विधिमंडळातही मराठ्यांचा आवाज घुमला. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील मराठा बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरू झालेला मोर्चा दोन तासांत शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला. तेथे पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये आवश्यक बदल करा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले.

या मोर्चानंतर सरकारकडून मराठा समाजासाठी नव्याने शैक्षणिक आणि कर्ज सवलतींची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकर्‍यांची भेट घेतल्यानंतर विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. याचा सर्वात मोठा फायदा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील विद्यार्थ्यांप्रमाणे सवलती देऊ केल्या आहेत.

त्यामुळे आता शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी असलेली 60 टक्क्यांची अट शिथिल करून 50 टक्क्यांवर आणण्यात आली आहे. याशिवाय, शेतकर्‍यांच्या 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ केले जाणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून हे व्याज भरले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधकांकडून ‘गोल… गोल’च्या घोषणा दिल्या गेल्या.

महामोर्चा इफेक्ट – 

  • अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती
  •  तीन लाख शेतकर्‍यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण
  •  फीमध्ये सवलत मिळणार, 10 लाख विद्यार्थ्यांना लाभ 
  • प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल उभारणार ; 5 कोटींचा निधी 
  •  मागासवर्गीय आयोगाला अहवाल देण्यासाठी मर्यादा देणार
  •  कोपर्डी प्रकरणी लवकरच अंतिम निकाल 
  • पोलिसांनी अनुभवला टेन्शन फ्री महामोर्चा

 

LEAVE A REPLY

*