मराठा समाजाचा मुंबईत आज झंझावात

0

आरक्षण मुद्यावरून विधीमंडळात विरोधक आक्रमक, नगरकरांची मुंबईकडे कूच

मोर्चाला रिपाइंचा पाठिंबा : ना. आठवले, मुस्लिम समाजाचेही समर्थन, मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक तैनात

मुंबईतील मोर्चासाठी नगर जिल्ह्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने रवाना होताना.

मुंबई – राजधानी मुंबईमध्ये आज बुधवारी होणार्‍या मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून राज्यभरातून मराठा बांधव काल मंगळवारपासूनच मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरवात झाली आहे. अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, पुण्यासह सगळीकडून विशेष गाड्यांमधून मराठा बांधवांनी मुंबईला कूच केली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांचे आमदार मुंबईतच असून अन्य तालुका, गावपुढारीही रवाना झाले आहेत.

 

राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईत होणार्‍या या ना भूतो ना भविष्यति मोर्चाची सर्व तयारी झाली आहे. सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, मराठा मोर्चात राजकीय भाषणं होणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील विविध मुस्लिम संघटनांनी मोर्चाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला रिपाइंचा पाठिंबा असल्याचे रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे.

मराठा आरक्षणावर नुसती चर्चा आता आम्हाला करायची नाही, आम्हाला आता आरक्षण पाहिजे, असे सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आज विधानपरिषदेत सरकारवर कडाडले. शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी अशी मागणी केली असता त्यावर मुंडे यांनी सरकारला आणि मेटे यांनाही खडे बोल सुनावले.

या मोर्चासाठी अहमदनगर, ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातला मराठा बांधव एकवटणार आहेत. त्यामुळे मुंबई आणि लगतच्या उपनगरामधील रेल्वे स्टेशनवर रेल मराठा स्वयंसेवक तैनात ठेवण्यात आले आहेत. तसंच मराठा मोर्चात सामील होणार्‍या वाहनांसाठी बीपीटी सिमेंट यार्ड आणि वडाळा ट्रक टर्मिनल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोर्चासाठी बाहेरुन येणार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी 5 हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत. पुणेमार्गे मुंबईत येणार्‍या लोकांसाठी पनवेल, कामोठे, खारघर, बेलापूर, जुईनगर, सानपाडा, वाशी तसेच ठाणे ऑक्ट्रॉय नाका, भाईंदर या ठिकाणी विशेष सोय करण्यात आली आहे.

दरम्यान, या मोर्चाला होणारी अभूतपूर्व गर्दी लक्षात घेता दक्षिण मुंबईतील जवळपास 500 शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाची सुरूवात जिजामाता उद्यानापासून होणार आहे. यानंतर हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाने खडा पारसी पुतळा, नेसबिट जंक्शन, जे.जे.उड्डाणपूल या मार्गाने आझाद मैदानात पोहोचणार आहे.

या मोर्चासाठी नगर जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपर्‍यातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले असून या मोर्चेकर्‍यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर मुंबईच्या दिशेने येणार्‍या रस्त्यावर वाहतूक मंदावली आहे.
दरम्यान, 35 हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, या दिवशी पोलिसांची साप्ताहिक सुट्टी, रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

स्थानिक पोलिसासह राज्य राखीव दल, क्यूआरटीसह विविध पथके तैनात असतील. आयुक्त दत्ता पडसलगीकर हे बंदोबस्ताचे नियोजन करीत असून, त्यासाठी सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिका-यांची सुकाणू समिती बनविण्यात आलेली आहे. शहर व उपनगरातील अपर आयुक्त व उपायुक्तांवर आपापल्या कार्यक्षेत्रातील बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे.

अनेकजण मुंबईत दाखल – मराठा क्रांती मोर्चाचा ‘फिव्हर’ जोर धरू लागला आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर शहर, तालुका, श्रीरामपूर, अकोले, राहाता, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नेवासा, शेवगाव, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत, पारनेर, जामखेड शहरांसह अनेक गावागावातून रेल्वे, बसेस, तसेच मिळेल त्या खासगी साधनांनी अनेक मराठा तरूणांनी कूच केली आहे. काल रात्रीच काहीजण मुंबईत दाखल झाले होते. तर काही मुंबईच्या वेशीवर होते. दरम्यान नगर जिल्ह्यातून जाणार्‍या वाहनांना कामोठे, सानपाडा आणि पनवले या भागात वाहनतळासाठी जागा देण्यात आली आहे.


मुंबईच्या मोर्चाला नगरमधून जाणार्‍या वाहनांना दहा हजार स्टिकर देण्यात आले आहेत. या मोर्चाच्या वातावरण निर्मित्तीसाठी गेल्या आवड्यात नगर शहरातून तरूणांनी स्वयंस्फूर्तीने दुचाकी रॉली काढली होती. मंगळवारी सकाळपासून शहरातून 500 च्या जवळपास चार चाकी वाहने मुंबईच्या दिशेने निघाले होती. दुपारपर्यंत ही वाहने पनवलेपर्यंत पोहचली होती. यासह शेवगाव, पाथर्डीतून 300 ते 400 वाहने, नेवाशातून 450 वाहने, कर्जत जामखेडमधून 450 ते 500 वाहने मुंबईकडे गेल्याचे सांगण्यात आले. उत्तर जिल्ह्यात कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नगर शहर याभागातून मोठ्या संख्याने मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे निघाले होते.


मंगळवारी सायंकाळी मोर्चाच्या संयोजन समितीची बैठक झाली असून यात मराठा समाजाच्या विविध प्रश्‍नांवर विधी मंडळात सर्व पक्षीय आमदार सरकारला जाब विचारणार असून त्यानंतर ते मोर्चाला समोरे जाणार आहेत. सभागृहात सरकार मराठा समाजासंदर्भात काय निर्णय घेेणार याबाबत मोर्चेकर्‍यांना कळणार असल्याची नगरहून समन्वय समितीच्या बैठकीला हजार असणार्‍यांनी सांगितली.

चर्चा काय करता, आरक्षण द्या – धनंजय मुंडे
मुंबई – मराठा आरक्षणावर नुसती चर्चा आता आम्हाला करायची नाही, आम्हाला आता आरक्षण पाहिजे, असे सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आज विधानपरिषदेत सरकारवर कडाडले. शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी अशी मागणी केली असता त्यावर मुंडे यांनी सरकारला आणि मेटे यांनाही खडे बोल सुनावले.

आरक्षणावर चर्चा करण्याची मागणी काय करता, आता आम्हाला चर्चा नको, आम्हाला आता मराठा आरक्षण हवे आहे. डिसेंबर 2014 पासून मराठा आरक्षणावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे उद्या राज्यातून लाखोंच्या संख्येने सहभागी होणारे मराठा हे आरक्षणाची सभागृहात चर्चा व्हावी म्हणून मराठा मोर्चात सहभागी होत नाहीत, तर त्यांना आता सरकारने मराठा आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी येत आहेत. त्यामुळे आता चर्चा नको असे सांगत मुंडे यांनी मेटे यांच्या मागणीवर जोरदार आक्षेप घेतले.

आम्हाला आता मराठा आरक्षणावर कोणतीही चर्चा करायच्या नाहीत, तर सरकारने आरक्षण जाहीर केले पाहिजे. आरक्षण देत नसाल तर तुम्ही सत्तेत असून चर्चा कसली मागता, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला, त्यादरम्यान, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा विषय कोणत्या आयुधांवर विचारला जात आहे, असा सवाल करत प्रश्‍नोत्तरे पुकारले. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे सभापतींनी 20 मिनिटांसाठी सभागृहाचे तहकूब केले.

 

LEAVE A REPLY

*