बलात्कार प्रकरणी डेराचे रामरहिम दोषी; पंचकुला कोर्टाचा निर्णय

0

चंडीगढ, ता. २५ : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांना विशेष सीबीआय न्यायालयाने आज बलात्कार प्रकरणात दोषी ठरविले. आसारामबापू प्रकरणानंतर हा सलग दुसरा निर्णय आहे.

या निर्णयानंतर राम रहिम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी २८ ऑगस्टला शिक्षा जाहीर करण्यात येणार आहे.

या निर्णयानंतर कायदा सुरक्षा राखण्यासाठी सैन्यदलाने पंचकुला परिसरात ध्वजसंचलन केले.

या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये हलकल्लोळ माजला असून अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या.

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम यांच्यावर दोन साध्वींवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्याप्रकरणी आज पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावनी झाली.

डेरा सच्चाचे अनुयायी दोन दिवसांपासूनच रस्त्यांवर ठाण मांडून होते. काही गैरप्रकार होऊ नये म्हणून पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांत १४४ चे जमावबंदी कलम लागू करण्यात आले.

मात्र तरीही लोक रस्त्यावरून हटत नसल्याने न्यायालयाने कडक शब्दांत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले होते.

येथील इंटरनेट आणि मोबाईल सेवाही बंद करण्यात आली होती. डेरा चे मुख्यालय असलेल्या शिरसा येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती.

निमलष्करी दलाच्या तुकड्या दोन्ही राज्यातील संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या साह्याने पोलिस परिसरावर नजर ठेवून होते.

न्यायालयात निघण्यासाठी ठिक १२.३०च्या सुमारास राम रहिम ४०० गाड्यांच्या ताफ्यांसह निघाले. मात्र केवळ दोनच गाड्यांना न्यायालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. दुपारी १.२३ ला ते पंचकुला उच्च न्यायालयात पोहोचले.

त्यानंतर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले.

सोशल मीडियावरही डेराच्या समर्थकांनी राम रहिम यांना पाठिंबा दिला.

 

LEAVE A REPLY

*