प्रतिमा निर्मितीसाठी खा. दानवेंचा प्रयत्न; इगतपुरीच्या शेतकऱ्यांशी साधणार संवाद

0
नाशिक | महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे येत्या शुक्रवारी (दि.२६) शिवार पाहणीच्या निमित्ताने इगतपुरी तालुका दौरयावर येत आहेत. दानवे यांच्या दौऱ्याची माहिती भाजपच्या जिल्हा नेत्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले म्हणून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर अनेक दिवसांपासून टीकेची झोड उठली आहे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे या मागणीसाठी सत्ताधारी पक्षातील शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्ष भाजपला कोंडीत पकडत आहेत.

विरोधकांची संघर्ष यात्रा बरीच चर्चेत आली होती. त्यानंतर भाजपकडून संवाद यात्रा काढली जाईल असे सांगण्यात आले होते. आता संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपने शिवार पाहणीचे नियोजन केले असून वरिष्ठ नेत्यांचा दौरा आखण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान विरोधकाच्या अपप्रचाराला हे नेते ठोस उत्तर देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ईगतपुरीच्या दौऱ्यावर येत असुन यात तालुक्यातील शेतकरयांशी ते संवाद साधणार आहेत.  आधी शेतकऱ्यांना बोलायचे नंतर त्यांच्या दारात येऊन सारवासारव करायची अशाही प्रतिक्रिया परिसरातून उमटू लागल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील विरोधी पक्षाची दानवे यांच्या दौऱ्याबाबत काय भूमिका घेतात हे अजूनतरी गुलदस्त्यातच आहे. तालुक्यातील भाजप कार्यकर्ते प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी कामाला लागले असून जवळपास तयारी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*