शेवगावात धनगर समाजाचा मोर्चा

0
शेवगाव (तालुका प्रतिनिधी)- येथील न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर यांच्या विरुध्द कर्मचारी मारहाण प्रकरणी दाखल करण्यात आलेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या घटनेची कसून चौकशी व योग्य कारवाई करावी अन्यथा, संपुर्ण राज्यभर आंदोलनाचा वनवा पेटवू असा इशारा यावेळी देण्यात आला.
धनगर समाजाच्यावतीने पोलीस ठाण्यात मोर्चाने येवून निवेदन देण्यात आले. निवेदनात प्राचार्य मतकर यांच्या मार्गदर्शनामुळे महाविदयालयाला पुणे विदयापीठाचा उत्कृष्ट ग्रामीण महाविदयालायाचा पुरस्कार, महाविदयालयास नॅक ‘अ’ श्रेणी मिळुन तसेच एनएसएसचा बेस्ट युनिट पुरस्कार मिळाल्याचे म्हटले आहे. यावरून या प्राचार्यांच्या कामाचा दर्जा स्पष्ट होतो. प्राचार्य मतकर यांच्यासारखा उच्चशिक्षीत व अल्पसंख्यांक समाजातील माणूस कधीही जातीवाचक शब्द वापरु शकत नाहीत. याउलट महाविदयालयात गुंडगिरी करणार्‍यांना भाव दिला नाही. यामुळे दुखावलेल्या समाजकंटकांनी फिर्यादीस हाताशी धरुन शेवगावचे वातावरण बिघडवण्याचा व जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेतील अंतर्गत गटबाजीची ही त्याला काळी किनार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी विविध वक्त्यांनी आमचा संयम पाहू नये, राज्यातील सरकार आमच्यामुळे आलेले आहे. या खोटया गुन्हयाची कलम 169 अंतर्गत चौकशी करुन गुन्हयातील सत्यता तपासावी. मतकर यांना बळीचा बकरा केले जात आहे. हा गुन्हा दाखल करण्यामागे वेगळी शक्ती काम करीत आहे. षडयंत्र रचुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर आठ दिवसात संपुर्ण राज्यात आंदोलन करु असा इशारा रासपचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गावडे, ज्ञानेश्वरचे माजी संचालक निवृत्ती दातीर, कॉ. बापुसाहेब राशिनकर, रासपचे आत्माराम कुंडकर, पाचेगावचे सरपंच दिलीप पवार यांनी दिला.
शेवगावचे उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी निवेदन स्विकारले. या प्रकरणाची संपुर्ण चौकशी केली जाईल कोणावरही अन्याय होणार नाही. कायदयाचा दुरुपयोग केला जाणार नाही असे आश्वासन आंदोलकांना दिले. मोर्चात नगरसेवक अशोक आहुजा, भाऊसाहेब कोल्हे, गणेश कोरडे, अजय नजन, अमोल मिसाळ, खादी ग्रामउदयोग संघाचे आबासाहेब मिसाळ, खरेदी विक्री संघाचे संचालक शहादेव खोसे, भाऊसाहेब डुकरे, रविंद्र घुगरे, गोरक्षनाथ कर्डीले, कारभारी वीर, गोपीनाथ चोरमारे यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*