मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरट्यांचा पर्दाफाश

0

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील म्हसोबा झाप येथे मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणार्‍या रॅकेटचा पारनेर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी एका आरोपीसह टॉवरसाठी वापरण्यात येणार्‍या 20 बॅटर्‍या व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी बिसमिल्ला इस्माईल शेख यास पारनेरच्या न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यास 2 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, तालुक्यासह जिल्ह्यात आजवर मोबाईल टॉवरच्या अनेक किमती वस्तूंच्या चोर्‍या झाल्या असून या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने आजवरचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे.
दि. 29 मे रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बिसमिल्ला ईस्माईल शेख (रा. राजूरी, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्यासह इतर तिन ते चार जण तालुक्यातील म्हसोबा झाप येथील इंडस मोबाईल टॉवरच्या कंपाउंडमध्ये घुसले. टॉवरसाठी असलेल्या बॅटर्‍यांचे कपाट उघडताच सिक्युरीटी आलार्मचा आवाज नियंत्रण कक्षात बसलेले टेक्नीशियन सुपरवायझर दिलीप पालवे यांना आला. त्यांनी तात्काळ सिक्युरिटी सुपरवायझर गोविंद दत्तात्रय मचाले (रा. कोळगाव ता. श्रीगोंदा) यांच्याशी संपर्क करून म्हसोबा झाप येथील टॉवरमध्ये चोरी होत असल्याची माहिती दिली.

पालवे यांचा फोन आला त्यावेळी मचाले व सुरक्षारक्षक मोहन कलगुंडे हे सुपे परिसरात सुरक्षेची पाहणी करीत होते. त्यांनी टाकळी ढोकेश्‍वर येथील दूरक्षेत्राशी संपर्क करून म्हसोबा झाप येथील टॉवरच्या बॅटर्‍यांचे कपाट अज्ञात चोरट्यांनी उघडल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ म्हसोबा झापकडे धाव घेतली.

मचाले व कलगुंडे हेही त्यांच्यापाठोपाठ म्हसोबा झापमध्ये पोहचले. दोन्ही पथके तेथे पोहचेपर्यंत चौघेही भामटे एका स्कॉर्पिओमध्ये टॉवरमधील विसही बॅटर्‍या चोरून तेथून निघाले होते. त्यांच्या समवेत दुसरे एक स्कॉर्पीओ वाहनही होते.
पोलिसांचे वाहन पोखरीच्या दिशेने येत होते तर सुरक्षारक्षकांचे वाहन म्हसोबा झापवरून चोरट्यांचा पाठलाग करीत होते. भामट्यांची दोन्ही वाहने पोखरी रस्त्याने पुणे जिल्ह्याच्या दिशेने चाललेली असताना समोरून येणार्‍या पोलिसांच्या वाहनामुळे एक वाहन आडले गेले तर दुसर्‍या स्कॉर्पीओमधून इतर तीन ते चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी 1 लाख 65 हजार रुपये किमतीची एम. एच. 04 बी. एन. 0160 ही स्कॉर्पीओ व 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 20 बॅटर्‍या आरोपी बिसमिल्ला शेख याच्याकडून हस्तगत केल्या.

बिसमील्ला शेख याने फरार झालेल्या इतर आरोपींची माहिती दिली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे पुढील तपास करीत आहेत. या आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता मातोंडकर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*