दंडकारण्य अभियानास 3 जुलैपासून प्रारंभ : आ. डॉ. तांबे

0
संगमनेर (प्रतिनिधी) – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची मूलभूत जबाबदारी बनली असून वृक्षारोपण व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढ्यांसाठी काळाची गरज बनली आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी 3 जुलैपासून तालुक्यात दंडकारण्य अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात आयोजित दंडकारण्य अभियानाच्या 12 व्या वर्षाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी बाजीराव पा. खेमनर, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सभापती निशाताई कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, प्रभारी प्रांताधिकारी मनोज देशमुख, प्रभारी तहसीलदार प्रियंका आंबरे, अ‍ॅड. मधुकरराव गुंजाळ, प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाची नोंद युनोने घेतली आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील 11 वर्षात तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये, कार्यकर्ते नागरिकांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, जयहिंद लोकचळवळ व अमृत उद्योग समूह, तालुुक्यातील विविध सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्यावतीने यावर्षी गावातील सहकारी संस्था, शालेय विद्यार्थी यांच्या सहभागाने गावातील रिकाम्या जागी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक वनीकरण व पंचायत समिती सहभागी होणार आहे.

यावेळी गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी. आर. भोसले, वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे, डी. एम. शिंदे, राहुल गायकवाड, आबासाहेब भोरे, नायब तहसीलदार मिलिंद कुलथे, अमोल गंभिरे, बी. एल. गिते, बाळासाहेब फापाळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब उंबरकर यांनी केले. नामदेव कहांडळ यांनी आभार मानले.

  या अभियानात काम करताना चांगल्या जागा निवडून योग्य वृक्षांच्या रोपणाबरोबर प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात, अंजन, करंजी, कढीपत्ता, आवळा, जांभूळ, शेवगा, आंबा, चिंच अशी बहुउपयोगी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज असल्याने तालुक्यातील परिसर हिरवागार होण्यासाठी दंडकारण्य अभियानात आबालवृध्दांसह सर्वांनी सक्रीय सहभागी व्हावे, असे अवाहनही आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

LEAVE A REPLY

*