अल्पसंख्याक शिष्यवृत्तीची वेबसाईट ‘आउट ऑफ ऑर्डर’

0

राहुरी स्टेशन (वार्ताहर) – अल्पसंख्याक समाजातील मुले व मुली शैक्षणिक प्रवाहात सक्रिय होऊन त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या अल्पसंख्याक व इतर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ‘नॅशनल स्कॉलरशिप पोर्ट व महाडेबीट’ या वेबसाईट ‘आऊट ऑफ ऑर्डर’ झाल्याने विद्यार्थी व पालकांची मोठी हेळसांड होत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य सरकारच्या महाडेबीट या वेबसाईटवर शेतकरी कर्जमाफी, आधार अपडेट व शिष्यवृत्ती या सर्व प्रक्रिया एकाच वेबसाईटवर असल्याने वेबसाईटवर मोठा लोड येऊन हा गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी बँक खाते व त्याला आधार लिंक करणे व आधारला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी व इतर अनेक कागदपत्रे जमा करताना होणार्‍या धावपळीनंतर अर्ज भरण्यासाठी साईटच ओपन होत नसल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत.

वेबसाईटच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केला असता साईट अपडेटचे काम चालू असल्याचे नेहमीप्रमाणे समोरून उत्तर देऊन बोळवण केली जात आहे. केंद्राच्या एनएसपी साईटवर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अनेक महाविद्यालयांची नावेच नसल्याने व अर्ज भरण्याची मुदत संपल्याने नाईलाजाने राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरावे लागत आहेत.

ती साईटही सुरळीत चालत नसल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. भारतीय अल्पसंख्याक आयोगाचा कायदा 1992 व त्यातील उपविभागान्वये, जनगणनेचा आधार घेत अल्पसंख्याक म्हणून मुस्लीम, शीख, ख्रिश्‍चन,

बौद्ध, पारसी यांचा समावेश करण्यात आलेला असून या समुदायातील विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच सोडून देण्यामागच्या कारणातील आर्थिक बाबींचा विचार करून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. शैक्षणिक जागृतीच्यादृष्टीने शासनाचा हा एक यशस्वी प्रयोग असला तरी याच्या अंमलबजावणीसाठी आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याची भावना अल्पसंख्याक समुदायातून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*