शाळा खोल्यांसाठी सदस्य आक्रमक

0
जि. प. सर्वसाधारण सभा : आरोग्य विभागाच्या कारभाराचे पोस्टमार्टम
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेने निर्लेखन केलेल्या प्राथमिक शाळांमधील मुलांना बसण्यासाठी वर्गखोल्या नसल्यामुळे 14 जूनपासून उघड्यावरच शाळा भरवाव्या लागणार आहेत़ यामुळे निर्लेखन झालेल्या शाळांना तातडीने वर्गखोल्या बांधण्यासाठी जिल्हा नियोजनकडून जास्तीजास्त निधी मिळावा, या मागणीचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत झाला. यासह आरोग्य विभागातील रिक्तपदे, प्राथमिक आरोग्य केंद्रावर असणारा औषधांचा तुटवडा, रिक्त जागा या विषयांवरून सदस्यांनी आरोग्य विभागाचे पोस्टमार्टम केले.
अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी जि.प.ची ही पहिली सर्वसाधारण सभा झाली़ मागील सभेचे इतिवृत्त वाचून सभेला प्रारंभ झाला़ सभा सुरु होताच सदस्यांनी आक्रमक होत निर्लेखन झालेल्या शाळांचा मुद्दा उपस्थित केला़ धोकादायक शाळांच्या वर्गखोल्या पाडण्यात आल्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्याच उपलब्ध नाहीत़ त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसूनच धडे गिरवावे लागतील असे सांगत सदस्यांनी जिल्हा नियोजनकडून निधी मिळण्याची मागणी केली़ तसेच काही शाळांच्या वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक असून,
या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही सदस्यांनी केली़
अध्यक्षा विखे यांनी दोन दिवसांपूर्वी या प्रश्‍नावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेवून शाळांच्या बांधकामासाठी अतिरिक्त निधीची माणगी नोंदवली असल्याचे स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हा नियोजनमधून 2 कोटी आणि जिल्हा परिषद सेसमधून 3 कोटी 50 लाखांचा निधी शाळा खोल्यांसाठी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या विषयावर सदस्य राजेश परजणे, किरण लहामटे, सीताराम राऊत, काशिनाथ दाते आणि उज्वला ठुबे यांनी चर्चा केली.
सदस्या सुष्मा दराडे यांनी आरोग्य विभागाचा मुद्दा उपस्थित केला. अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस शिल्लक नाहीत असे सांगताच, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गांडाळ यांनी दर आठवड्याला उपलब्ध लस आणि औषधांचा जिल्हा पातळीवरून आढावा घेण्यात येत असल्याचे सांगितले. त्यावर सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी प्राथमिक केंद्रात शिल्लक नसलेल्या औषधाची यादीच सभागृहात वाचून दाखवली.
आरोग्य केंद्रात गैरहजर राहणार्‍या डॉक्टरांवर कारवाई का केली नाही, असा सवाल अध्यक्षा विखे यांनी केला. परजणे यांनी सदस्यांनी प्रशासनावर केलेले आरोप आरोग्य विभागाने खोट सिध्द करून दाखवावे, असे आव्हान देत सामान्य माणसांच्या आरोग्याशी खेळू नका, असे खडे बोलही सुनावले.
कंत्राटी वाहन चालकांच्या नेमणुकीची निविदा प्रक्रिया न झाल्याने जिल्ह्यातील 62 रुग्णवाहीका दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी उभ्या असल्याचे माहिती आरोग्य विभागाकडून दिल्यानंतर सदस्य आणखीन आक्रमक झाले. सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून आरोग्य संस्था उभ्या करत आहेत.
मात्र, अधिकार्‍यांच्या दुर्लक्षपणामुळे सरकार योजना, कार्यक्रम राबवणे अशक्य झाले आहे. अधिकारी गंभीर नसतील तर उपयोग काय? असा सवाल परजणे यांनी उपस्थित केला. शेवगाव तालुक्यात आरोग्य खात्यात वेगळी परिस्थिती नसल्याचे सभापती क्षितिज घुले यांनी सांगितले. जिल्ह्यात औषध निर्माण अधिकार्‍यांच्या जागा रिक्त असून त्या तातडीने भरण्याची मागणी घुले यंानी केली.
अन् परजणे भडकले
सभागृहात सदस्य वाकचौरे यांनी पदाधिकारी यांच्या स्वीय साहय्यक यांच्या बदल्याचा विषय उपस्थित केला. त्यावर अध्यक्षा विखे संतप्त होत हा विषय पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात आपसी होता. तो आता संपलेला आहे. मात्र, त्यावर वाकचौरे यांनी पुन्हा या विषयाचा आग्रह धरला. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे जि.प.चे 125 कोटी परत जाण्याची नामुष्की आली, आदी विषयावर चर्चा करण्यास सुरूवात केली. त्यावर त्यांना खाली बसवण्यात आले. त्यानंतर परजणे बोलण्यास सुरू झाल्यानंतर तुमचेचे चालू द्या, असे वाकचौरे म्हणताच परजणे संतप्त झाले. मी देखील या सभागृहाचा सदस्य आहे. वाकचौरे यांनी विनाकरण विषयला बगल देवू नये. अध्यक्षा विखे यांच्या सोबत बहिणीचे नाते सभागृहा बाहेर आहे. या ठिकाणी जिल्हा म्हणून चर्चा करत असल्याचे परजणे यांनी सुनावले.

 

LEAVE A REPLY

*