शाब्दिक चकमकीमुळे शेवगाव पालिकेची सभा गाजली

0

सहा-सातच नगरसेवकांची उपस्थिती;
तब्बल साडेपाच तास झाले कामकाज

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – नगरपालिकेच्या मागील सभेत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून स्थगित झालेली सभा काल झाली. मात्र या सभेला मोजकेच सहा ते सात नगरसेवक उपस्थित होते. मात्र ही सभा नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे चांगलीच गाजली.

24 जुलै रोजी तहकूब झालेली सभा काल बोलाविण्यात आली होती. सभेला मोजकेच नगरसेवक उपस्थित असल्यामुळे सभेचे कामकाज सुरू होण्यास एक तास उशीर झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विद्या लांडे होत्या. शहरातील उखडलेल्या रस्त्यांवर मुरूम टाकण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले. मात्र या मुरुमाची रॉयल्टी कोणी भरायची यावर नगरसेवक अरुण मुंढे व अशोक आहुजा यांनी प्रश्‍न उपस्थित केला.

ठेकेदरांना वेळेवर बिले मिळत नसल्यामुळे पालिकेचे कामे वेळेवर होत नसल्याचा मुद्दा नगरसेवक अरुण मुंढे यांनी उपस्थित केला. यावेळी मुंढे व मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. यापूर्वी चुकीच्या पध्दतीने बिले काढल्याचे प्रकार झाले आहेत. तसे पुरावे माझ्याकडे आहेत असे कुरणावळ यांनी सांगत माझ्या काळात मी कोणतीही नियमबाह्य काम करणार नाही, असे ठणकावून सांगितले.

या सभेत बांधकाम, आरोग्य, वीजेचे दिवे व अन्य विषयांवर चर्चा झाली. पालिकेचे कोणते काम कोणत्या निधीतून केले जात आहे. याची माहिती नगरसेवकांना देण्यात यावी असे नगरसेवक सागर फडके यांनी सूचवले. तर पालिकेने आपल्या हद्दीतील खरेदी विक्री व्यवहारांसाठी पालिकेचा ना हरकत दाखल्यासाठी 500 रुपये शुल्काऐवजी 200 रुपये शुल्क आकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. गटारींची स्वच्छता लवकर करावी व पावडर आणि इतर साहित्य तेथे टाकावे अशी मागणी नगरसेवक वजीर पठाण यांनी केली.

दुपारी 12 वाजता सुरू झालेली ही बैठक 5.30 वाजेपर्यंत चालली. अनेक नगरसेवकांनी बांधकाम रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य, पाणीपुरवठा, 14 वा वित्त आयोगाची कामे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील कामे या विषयांवर चर्चा उपस्थित केली. चर्चेत सागर फडके, उमर शेख, भाऊसाहेब कोल्हे, विकास फलके, शब्बीर शेख, अरुण मुंढे, अशोक आहुजा यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सहभाग घेतला.

यावेळी उपनगराध्यक्षा यमुना ढोरकुले यांच्यासह महिला नगरसेवकही उपस्थित होत्या. शेवगाव शहर स्वच्छ करण्याचा संकल्प असून त्यासाठी 11 ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. शहरात शौचालयांची संख्या 70 टक्के इतकी असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण केली जातील. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील कामेही सा. बां. विभागाच्या सहकार्याने पूर्णंत्वास येतील असे मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*