#MarathaKrantiMorcha : मुंबापुरीत मराठ्यांची त्सुनामी; महत्वाचे काही मुद्दे!

0
मुंबई- मराठा आरक्षणासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी राज्यभर उठलेले मराठा क्रांती मूकमोर्चाचे ‘एक मराठा- लाख मराठा’ वादळ आज देशाची आर्थिक राजधानी मुंबईत धडकले आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले असून मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भायखळा येथील जिजामाता उद्यानातून महिलांच्या नेतृत्त्वात मराठा मोर्चा सकाळी अकरा वाजता सुरु झाला आहे. जेजे उड्डाण पुलावरुन निघून हा मोर्चा दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आझाद मैदानावर पोहचला. मराठा समाजाच्यावतीने तरुणींच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले.
 • सरकार नरमले
  मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार समितीला कॅबिनेट दर्जा देणार. समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही.
  राज्य मागास आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहीत कालावधीची मर्यादा देणार.
  मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सहा लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्के करणार
  प्रत्येक जिल्ह्यातील मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारणार
 • नगरकरांची गर्दी
  अहमदनगरकडून येणार्‍या वाहनांसाठी मुरबाड येथे महामार्गालगत कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज मैदानात आणि डोंबिवलीत संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील वाहनतळ नगरकरांच्या गाड्यांनी फुल्लं झाले होते.
 • मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यभरात 57 मोर्चे निघाले असून मुंबईतील हा 58 वा निर्णायक मोर्चा आहे.
 • राजर्षी शाहू महाराजांची मराठाहिताची संकल्पना, अन् अठरापगड जातीजमातीच्या प्रश्‍नालाही सखल मराठा विचारांची साथ राहील. सरकारने हा मोर्चा गांभिर्याने घ्यावा.- शरद पवार
  सरकारने आजच विधीमंडळात एका ओळीचा ठराव आणून आरक्षण जाहिर करावे. – ना. राधाकृष्ण विखे पाटील.
  मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भात महत्त्वाची घोषणा करतील- रावसाहेब दानवे
 • मराठा आरक्षण मुद्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.
  विधीमंडळात मराठा आरक्षणाच्या मुद्याच्या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब
  खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा मराठा मोर्चात सहभाग
  सभागृहात राजदंड उचलण्याचा विरोधकांचा प्रयत्न
  मोर्चा मार्गातील राजकीय बॅनर मोर्चेकर्‍यांनी हटविले
  विधानसभेत चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार
  मराठा आरक्षणासाठी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी
  अभिनेता रितेश देशमुखचाही मुंबईतील मराठा मोर्चाला पाठिंबा
  विधानभवनाबाहेर भाजप आमदार आणि मंत्र्यांचा मुंबईतील मराठा मोर्चाला पाठिंबा
  मुंबईतील जेजे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद, फक्त मोर्चेकर्‍यांना तेथून जाण्याची परवानगी
  भाजप नेते आशिष शेलार यांना आझाद मैदानात मराठा कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की
  नवी मुंबईतील सर्व पार्किंग ग्राऊंड जवळपास फुल्ल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या गाड्या पार्क
  तब्बल 20 ते 25 लाख कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.
  मुंबईच्या दिशेेने जाणार्‍या सर्व वाहनांना टोल माफ करण्यात आले आहे.
  शिवाजी मंदिर येथे मराठा संघटनांचे डिझास्टर मॅनेजमेंट सेल.
  मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी सेलकडून घेण्यात येत आहे.

बंदोबस्तासाठी 50 हजार पोलीस

मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून 50 हजार पोलिसांच्या ताफ्याची मंगळवारी रात्रीपासूनच गस्त सुरू करण्यात आली. या मोर्चात सहभागी होणार्‍यांची अपेक्षित संख्या लक्षात घेता, बंदोबस्तासाठी शहराबाहेरूनही अतिरिक्त कुमक मुंबईत दाखल झाली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणांची चाचपणी करून अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राणीचा बाग, खडा पारसी जंक्शन, होन्डा कॉर्नर जंक्शन, मगदुमशहा उड्डाणपूल (जे.जे. पूल), एमआरए मार्ग पोलिस ठाणे व आझाद मैदान आदी बंदोबस्ताच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट आहेत. या ठिकाणांची इत्थंभूत माहिती मुख्य नियंत्रण कक्ष, दक्षिण प्रादेशिक व मध्य प्रादेशिक नियंत्रण कक्षावरून संपर्क साधून दिली जात होती.

विधानसभेत आरक्षणाची भूमिका मांडा
अशिष शेलारांना सुनावले…
मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना धक्काबुक्की झाल्याचे समजते. मोर्चेकर्‍यांनी शेलार यांना आझाद मैदानात येण्यापासून अटकाव करत ‘विधानसभेत जाऊन तुम्ही मराठा आरक्षणाची भूमिका मांडा. तिथे तुमचे काम करा. येथे येऊ नका. येथे यायचंच असेल तर काहीतरी ठोस आश्वासन घेऊन या, असे खडेबोल त्यांना सुनावण्यात आले.
आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चांपासून राजकीय नेत्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना मोर्चाच्या व्यासपीठावर येऊ देण्यात आलेले नाही. जिल्हावार मोर्चात सहभागी झालेल्या स्थानिक नेत्यांना इतर मोर्चेकरांसोबतच चालावं लागले आहे. मुंबईतील आजचा मोर्चाही त्याला अपवाद नव्हता.

डबेवालेही सहभागी
मुंबईतील चाकरमान्यांच्या जेवणाची वर्षानुवर्षे व्यवस्था करणारे मुंबईचे डबेवाले मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चात सहभागी झाले आहेत. यामुळे बुधवारी डबेवाल्यांची सेवा ठप्प झाली.

दक्षिण, मध्य मुंबईतील शाळा बंद
कुलाबा ते सायन वांद्रे परिसरातील 500 शाळा मराठा मोर्चाच्या निमित्ताने सुट्टी देण्यात आली. वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने शालेय वाहतुकीस या मोर्चामुळे अडचण निर्माण होईल. ही शक्यता लक्षात घेऊन दक्षिण व मध्य मुंबईतील शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.़

मराठा मोर्चात सामील होणार्‍या वाहनांसाठी बीपीटी सिमेंट यार्ड आणि वडाळा ट्रक टर्मिनल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मोर्चासाठी येणार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी 15 हजार स्वयंसेवकाची फौज सज्ज कार्यरत होती. हे स्वयंसेवक मोर्चात समन्वयकाची भूमिका बजावतानाच मोर्चाचा मार्ग तसेच पार्किंग व्यवस्थेविषयी मार्गदर्शन करत होते.

मोर्चाच्या निमित्ताने मुंबईत 8 आरोग्य कक्ष उभारण्यात आले असून प्रत्येक आरोग्य कक्षात 10 पुरुष व महिला डॉक्टर्सची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. आझाद मैदानाचे प्रवेशद्वार 40 फुटांपर्यंत मोठे करण्यात आले असून मैदानात पिण्याच्या पाण्याचे टँकर्स तसेच 20 फिरत्या शौचालयांची सोय करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*