मुंबईच्या क्रांतीमोर्चासाठी राहुरीत समाज बांधवांची बैठक

0
राहुरी (प्रतिनिधी) – मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी दि. 9 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार्‍या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर राहुरी तालुका मराठा एकीकरण समितीच्या वतीने काल गाडगेबाबा आश्रमशाळा येथे सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.
बैठकीत संपूर्ण तालुक्यातील गावानिहाय शेकडो मराठा बांधव उपस्थित होते. दरम्यान अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठा समाजाच्या मागण्याबाबत चर्चा केली. मराठा एकीकरण समितीच्या माध्यमातून तालुक्यात मराठा समाजाच्या विविध प्रश्‍नांसाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. मराठा एकीकरण समितीचे सक्रीय सदस्यांचे अर्ज भरून घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ज्या समाज बांधवांना सभासद अर्ज भरायचे आहे, त्यांनी मराठा एकीकरण समितीच्या समन्वयकांना संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
मराठा मोर्चा दरम्यान मुंबईत दाखल होताना मराठा बांधवांनी शिस्त व नियम पाळावे, यासंदर्भात सूचना देत त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रवासावेळी एक्सप्रेस महामार्ग असल्याने वाहनांची हवा तपासावी. शिवीगाळ, अश्‍लील हावभाव, असभ्य वागणूक कोणत्याही समाजाविरोधात घोषणा देऊन वातावरण बिघडू नये, मोर्चाचे नेतृत्व वैयक्तीक कोणी करत नसल्याने एकमेकांना मदत करा, वाहतूक कोंडी झाल्यास पुढाकार घेवून रस्ता मोकळा करण्यास मदत करावी.
पोलीस आपलेच सहकारी आहेत. वाहतूक नियंत्रण कामी त्यांना सहकार्य करावे, महिला व वृद्धव्यक्तींचा मोर्चात लक्षणीय सहभाग राहणार आहे.त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वाची आहे. मोर्चात मौजमजा म्हणून न जाता निषेध करण्यासाठी जात आहोत. असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
रेल्वेने जाताना तिकीट काढूनच प्रवास करावा.तसेच प्रवासादरम्यान स्टंट टाळावे, अनोळखी वस्तू आढळल्यास पोलीस किंवा स्वयंसेवकांच्या लक्षात आणून द्यावे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करा, मोर्चात सहभागी होताना प्रत्येकाने दोन दिवस पुरेल एवढे पाणी व जेवण सोबत आणावे. मुंबईत मित्रमंडळी अथवा नातेवाईकांकडे राहण्याची सोय करावी. मधुमेह, रक्तदाब किंवा इतर कोणत्याही विकाराचा त्रास असल्यास औषधे सोबत ठेवावी.स्व:तचे ओळखपत्र खिशात ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी दशमेश गोसावी समाज, अपंग प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांनी मराठा क्रांती मोर्चास पाठिंबा दिला आहे. दि. 9 ऑगष्टला मराठा क्रांती मोर्चा झाला म्हणजे आपले काम संपले असे होत नाही. चारशे वर्षानंतर मराठा समाज पुन्हा एकत्रित आला आहे. हा एकोपा कायम ठेऊन समाजातील लोकांना बरोबर घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मराठा एकीकरण समितीच्यावतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*