मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी राहुरीत रविवारी बैठक

0

राहुरी (प्रतिनिधी) – मुंबई येथे येत्या 9 ऑगस्ट रोजी निघणार्‍या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी राहुरी येथे रविवार 6 ऑगस्ट रोजी सकाळी संत गाडगेबाबा आश्रम शाळा राहुरी येथे सकल मराठा समाज राहुरी तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे मराठा एकीकरण समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कोपर्डी घटनेने 400 वर्षांनंतर मराठा समाज जागा होऊन सबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. मात्र सरकारकडून मोर्च्यामधील मागण्यांची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. मराठा समाजाने कोपर्डी घटनेतील अत्याचारित भगिनीला न्याय द्यावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतकर्‍यांसाठी स्वमिनाथान आयोगातील शिफारशी लागू कराव्यात, अट्रॉसिटी कायद्यातील जाचक अटी कमी कराव्यात या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे सरकारला कळविल्या होत्या.

कोपर्डी घटनेला एक वर्ष पूर्ण होऊन देखील आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. तसेच अन्य मागण्यांबाबत देखील सरकार गंभीर दिसत नाही. मोर्चा मधील एकही मागणीविषयी सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये सरकारबाबत प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी शेवटचे अस्र म्हणून 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे.

या मोर्चासाठी राहुरी तालुक्यातील 96 गावांतील शेकडो वाहने मुंबई येथे जाणार आहेत. या वाहनांचा वाहन तळ, मुंबई मध्ये जाण्याचा मार्ग इतर बाबींवर चर्चा केली जाणार आहे.
नियोजन करण्यासाठी राहुरी तालुक्यातील सकल मराठा समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, सरकारी नोकरदार, सर्व संघटनांचे सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे अवाहन राहुरी तालुका मराठा एकीकरण समितीच्या वतीने कण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*