मनपाच्या श्‍वान नसबंदी प्रकल्प अडचणीत

0

पिंपळगाव ग्रामस्थांकडून मोकाट श्‍वान घेवून येणारे वाहन पेटवण्याची धमकी

अहमदनगर (प्रतिनिधी)- तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया प्रकल्प सुरू केलेला आहे. मात्र, या प्रकल्पाला पिंपळगाव आणि डोंगरगण या गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत ग्रामसभेत ठराव घेवून त्याची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पावरून पिंपळगाव ग्रामस्थ आणि महापालिका प्रशासन आमने-समाने येणार असल्याची चिन्हे आहेत. यात मात्र मोकाट कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेवर (खच्चीकरणावर) विघ्न येणार आहे.

नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा विषय गंभीर बनल्याने या विरोधात शहरातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी महापालिकेत आंदोलन करत तातडीने शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजन करण्याची मागणी केली. आ. संग्राम जगताप आणि महापौर सुरेखा कदम यांच्या सुचनेनूसार महापालिका प्रशासनाने शहराबाहेर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शिवारात शहरातील मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प सुरू केला.

मात्र, या प्रकल्पाला पिंपळगाव, डोंगरगण ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. या दोन्ही गावाने ग्रामसभेचा ठराव घेवून या ठिकाणी असणारे श्‍वान शस्त्रक्रिया प्रकल्प बंद करण्याची मागणी केली आहे. नुकतेच शंभुराजे बहुउद्देशीय संस्थेचे कर्मचारी वाहन क्रमांक एमएच 16 एबी 3828 मधून मोकाट श्‍वान पिंपळगावला घेवून जात असतांना ग्रामस्थांनी वाहन अडवून दमदाटी केली.

तसेच पुन्हा या ठिकाणी वाहन आणल्यास ते पेटवून देण्याची धमकी दिली असल्याची तक्रार संस्थेचे संतोष नवसूपे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली. त्यावर आयुक्तांनी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी यासंदर्भात पोलीसात फिर्याद देण्याची सुचना दिल्या आहेत. यामुळे पिंपळगावमधील श्‍वान शस्त्रक्रिया प्रकल्प वादात सापडला आहे. या प्रकल्पावरून या ठिकाणी वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत.

  • दरम्यान आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांच्याशी संपर्क साधला असता, पालीका प्रशासनाकडून पिंपळगाव प्रकरणी पोलीसात फिर्याद देण्यासंदर्भात पत्र आले आहे. मात्र, घडलेल्या प्रकराची शहानिशा करावी लागणार आहे. खरोखर असा प्रकार घडला आहे का? घडला असल्यास ग्रामस्थांचा काही गैरसमज झाला का? ग्रामस्थांची समजूत काढूत यातून मार्ग काढता येतो का ? यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या प्रकल्प सुरू असल्याचे डॉ. बोरगे यांनी सांगितले.
  • महापालिकेने पिंपळगावात सुरू केलेल्या श्‍वान शस्त्रक्रिया प्रकल्पाचा त्रास गावातील शेतकरी, शेत मजूरांना सहन करावा लागत आहे. या ठिकाणी शहरातून कुत्र आणून सोडून दिले जातात. त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही. या ठिकाणी कुत्रे हालहाल होवून मरत आहे. आधीच शेतात रान डुकरांचा त्रास असतांना आता शहरातील मोकाट कुत्र्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. याबाबत पालिका प्रशासनाला पत्र दिलेले आहे. मात्र, उपयोग झालेला नाही. आता या प्रश्‍नावर उपोषण करण्यात येईल.  

    – संतोष झीने, सरपंच, पिंपळगाव माळवी.

LEAVE A REPLY

*