महापालिका निवडणूक प्रक्रीया निर्भय वातावरणात पार पाडावी – जे.एस.सहारिया

0

 

मालेगाव :  मालेगाव महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रक्रीया निर्भय  आणि शांततेच्या वातावरणात  पार पडावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन्न बी., जिल्हा पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त रविंद्र जगताप, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसिलदार डॉ. सुरेश कोळी, अप्पर पोलीस अधिक्षक राकेश ओला आदी उपस्थित होते.

श्री.सहारिया म्हणाले, निवडणूकीत कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत आणि  मतदानाच्या वेळी विद्युत प्रवाह खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. संपूर्ण निवडणूक प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडावी.  राजकीय पक्षांनी  30 जूनपर्यंत तर महानगरपालिकेने 30 जुलै पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे.  मतदार जागृतीसाठी  आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी  अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे. तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत यावेळी दिल्यात.

याप्रसंगी सचिव श्री.चन्ने, जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्णन, पोलीस अधिक्षक श्री.शिंदे यांनी विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले.

मुख्य निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त रविंद्र जगताप यांनी मतदार प्रक्रियेविषयी बैठकीत माहिती दिली. सर्व मतदान केंद्राना आदर्श बनवण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असून अपंगासाठी रेलींगसह रँप, पिण्यासाठी पाणी, मतदान केंद्राच्या ठिकाणी सावली आदी व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी मतदानाच्यावेळी करण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राजकीय प्रतिनीधींबरोबर बैठक : श्री.सहारिया यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्याशी निवडणूक प्रक्रीयेविषयी चर्चा केली.  बैठकीस भाजप, काँग्रेस, एम.आय.एम, जनता दल सेक्युलर, राष्ट्रवादी, शिवसेना, मार्क्सवादी, आदी पक्षांचे  प्रतिनीधी उपस्थित होते. बैठकीत मतदानाची वेळ वाढविणे, प्रचार कार्यालयास परवानगी, बोगस मतदार ओळखपत्र आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

*