मालेगाव मनपा निवडणूक : अखेरच्या दिवशी ४४६ अर्ज दाखल ; ८४ जागांसाठी ७८१ नामांकने

0
मालेगाव : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतीम मुदतीत 21 प्रभागातील 84 जागांसाठी 781 नामांकन अर्ज इच्छुक उमेदवारांनी दाखल केले.  आज दुपारी 3 वाजेपर्यंत अंतीम मुदत असल्याने नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या सातही कार्यालयांवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची एकच गर्दी उसळली होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी-जनता दल आघाडी व एमआयएम पक्षासह अपक्ष उमेदवारांनी देखील शक्तीप्रदर्शन करत आपले नामांकन दाखल केले. आज तब्बल 446 नामांकन अर्ज इच्छुकांतर्फे दाखल केले गेले.

महानगरपालिकेच्या 21 प्रभागातील 84 जागांकरिता होत असलेली निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. मात्र एकाही पक्षास सर्व 84 जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाही हे देखील आज मुदतीनंतर स्पष्ट झाले. भाजपतर्फे सर्वाधिक 77 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहे. या पाठोपाठ राष्ट्रवादी-जनता दल आघाडी 76, काँग्रेस 74, शिवसेना 26 व एमआयएम पक्षातर्फे 20 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
29 एप्रिलपासून नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला होता. सात ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे कार्यालय कार्यान्वित करण्यात आली होती. प्रारंभी नामांकन अर्ज कमी प्रमाणात दाखल झाले. मात्र अखेरच्या तीन दिवसात नामांकन अर्जांचा अक्षरश: पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे. परवा शुक्रवारचा मुहूर्त साधत तब्बल 219 अर्ज दाखल झाल्याने आज शनिवारी शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल होण्याचा कयास व्यक्त केला जात होता. तो अखेर 446 अर्ज दाखल झाल्याने खरा ठरला.
भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड, नगरसेवक मदन गायकवाड, युवराज वाघ, संजय काळे, विजया काळे, मनिषा हिरे, नरेंद्र सोनवणे, गुलाब पगारे, विजय देवरे, सौ. दीपाली वारूळे, सुवर्णा राजेंद्र शेलार, रेखा चौधरी, प्रविण बच्छाव, भरत बागुल आदी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह येत आपले नामांकन अर्ज दाखल केले.
काँग्रेसतर्फे महापौर पदाचे उमेदवार माजी आ. शेख रशीद, एजाज उमर, सौ. मंगला धर्मा भामरे, इरफान अली, खालीद हाजी, माजी महापौर ताहेरा शेख रशीद आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
जनता दलाचे महानगराध्यक्ष बुलंद एकबाल यांच्यासमोर प्रभाग 12 मधून समाजवादी पक्षातर्फे स्व. निहाल अहमद यांचे पुत्र इस्तियाक अहमद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या प्रभागात दोघा भावांमध्ये लढतीची शक्यता दिसून येत आहे.

प्रभाग 20 मध्ये काँग्रेसतर्फे महापौरपदाचे उमेदवार माजी आ. शेख रशीद यांच्यासमोर राष्ट्रवादीतर्फे अजीज लल्लु यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. अनेक गुन्ह्यात अजीज लल्लु तुरूंगात असतांना 2002 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत जनता दलातर्फे ते विजयी झाले होते. यानंतर त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले होते. मात्र राष्ट्रवादीतर्फे त्यांना उमेदवारी देत शेख रशीद यांच्यासमोर उभे करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. प्रभाग 21 मधून विद्यमान उपमहापौर हाजी मो. युनूस ईसा यांनी एमआयएमतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सहकार नेते राजेंद्र भोसले यांनी प्रभाग 9 मध्ये आघाडी स्थापन केली असून आज या आघाडीतर्फे अनंत भोसले यांनी समर्थकांचे शक्तीप्रदर्शन करत आपले नामांकन अर्ज दाखल केला.

LEAVE A REPLY

*