पीकानुसार पाण्याचे योग्य नियोजन करा – ना. प्रा. राम शिंदे

0
नाशिक :  पर्यावरणात होणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करण्याची नितांत गरज असून पीकानुसार पाणी वापराचे योग्य नियोजन करा , असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री  प्रा. राम शिंदे यांनी केले.

सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, कार्यकारी अभियंता राजेश शिंदे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सरपंच संजय नागरे, अर्जुन बोडके आदी उपस्थित होते.

श्री.शिंदे म्हणाले, पावसाचे पाणी अडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान यशस्वी ठरले आहे. अनेक मान्यवर व्यक्ती आणि संस्थांनी या अभियानाला जोडून घेतले आहे. त्यामुळे या अभियानातील लोकसहभाग वाढतो आहे. अभियानामुळे शिवारात पाणी दिसू लागले आहे आणि भूजलाच्या पातळीतही सुधारणा होत आहे.

पाण्याच्या उपलब्धतेमुळे कृषी उत्पादनही वाढले आहे. सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाला ही योजना वरदान ठरेल, असे त्यांनी सांगितले. शासनाने धरणातील पाणीसाठा वाढावा आणि शेतकऱ्यांना सुपिक गाळ मिळावा यासाठी सुरू केलेली  ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजना खऱ्या अर्थाने जनतेची योजना असून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वडझिरे येथे सहा विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या 17 कामांपैकी 15 पुर्ण झाली आहेत. त्यावर 84 लाख 30 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यात 2015-16 मध्ये 31 गावात आणि 2016-17 मध्ये 21 गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. वडझिरे गावात युवा मित्र संघटनेतर्फे चार किलोमीटर नाल्याचे खोलीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामांचा  लाभ शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी त्यांनी नाल्यातील गाळ काढण्याचा शुभारंभ केला. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली.

LEAVE A REPLY

*