सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच साकारेल मेक इन नाशिकचे स्वप्न

नेहरू सेंटरमधील विविध चर्चासत्रांमधून मान्यवरांचे मत

0

मुंबई, दि. ३१ (विशेष प्रतिनिधी) : नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभलेले नाशिक काळानुरूप आधुनिकतेच्या दिशेने बदलत आहे. मेक इन नाशिकचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची क्षमता या बदललेल्या नाशिकमध्ये आहे. मात्र त्यासाठी सर्वस्तरावर सर्वांनी एकत्र येऊन, एकदिलाने काम करण्याची गरज असल्याचा सुर वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये सुरू असलेल्या मेक इन नाशिक परिषदेतील चर्चासत्रांमध्ये उमटला.

दि. ३० आणि ३१ मे दरम्यान मेक इन नाशिक परिषदेत नाशिकच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सीईंग इज बिलिव्हिंग या सत्रात सुला वाईनची यशकथा सादर करण्यात आली. सुलाचे उपाध्यक्ष डॉ. नीरज अग्रवाल यांनी यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

सुलाचे संचालक राजू सामंत यांनी द्राक्षशेतीतून रोजगाराची निर्मिती व्हावी या दृष्टीने कॅलिफोर्नियाला प्रशिक्षण घेऊन नाशिकमध्ये हा उद्योग सुरू केला. सुरुवातीला त्यात त्यांना असंख्य अडचणी आल्या मात्र नंतर् विविध संकल्पना यशस्वीपणे राबवून त्यांनी नाशिकचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले, असे विविध पैलू या वेळी सादर करण्यात आले. नाशिकच्या उद्योगांत जगाला गवसणी घालण्याची क्षमता आहे आणि मेक इन नाशिकही नक्कीच यशस्वी होईल हा त्यामागचा उद्देश होता.

नाशिकच्या विकासामध्ये उद्योगांचा हातभार हे चर्चासत्र आज दि ३१ रोजी सकाळच्या सत्रात संपन्न झाले. नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे, टीसीएस उद्योग समुहाचे उपाध्यक्ष हासित काझी यांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदविला. नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्ण त्रिकोणाच्या परिसरात झपाट्याने शहरीकरण होत असून त्याबाबतीत या विभागाचा जगात दुसरा क्रमांक लागतो.

आगामी काळात शहरीकरणासोबत रोजगाराचा प्रश्न येथे निर्माण होणार आहे. त्यासाठी या ठिकाणी जास्तीत जास्त उदयोगांनी येऊन रोजगार निर्मिती करावी असे आवाहन आयुक्त महेश झगडे यांनी केले. सीएसआरच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे जीवन सुरळीत होण्यासाठी निर्माण केलेल्या विविध मोबाईल ॲप्लीकेशन्सची माहिती टीसीएसचे हासित काझी यांनी दिली. नाशिकच्या युवकांसाठी कंपनीने डिजिटल इनिशिएटीव्ह प्रशिक्षण केंद्राला सुरुवात केली असून हे केंद्र सुरू होण्याकरता विविध परवानग्यांसह केवळ सहाच महिन्यांचा कालावधी लागल्याचे सांगत त्यांनी नाशिककरांचे कौतुक केले.

त्यानंतर दुपारी संपन्न झालेल्या बदलते नाशिक या चर्चासत्रात तापडीया टूल्सचे संचालक जयप्रकाश तापडिया, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहायक व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, एसटीपीचे संजय गुप्ता, प्रविण तांबे आणि ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांनी सहभाग नोंदविला. नाशिकच्या विकासासाठी निमासह सर्व संस्थांनी एकत्र आले पाहिजे, तसेच महापालिकेसह राजकारण्यांनीही उदयोग जगताला पाठिंबा दिला पाहिजे.

स्वत:चा उदयोग केंद्रीभूत न ठेवता उद्योगजगत म्हणून संपूर्ण नाशिक शहराचा विचार करायला पाहिजे, तरच मेक इन नाशिकचे स्वप्न साकारेल असा विचार शैलेंद्र तनपुरे यांनी मांडला. दिवंगत बाबूभाई राठींसारख्या नाशिककरांच्या द्रष्टेपणामुळेच नाशिकचे उद्योग जगत उभे राहू शकले अशी माहिती जयप्रकाश तापडिया यांनी दिली. सॉफ्टवेअर निर्यातीत नाशिकने आघाडी घेतली असल्याची माहिती सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कचे संजय गुप्ता यांनी दिली.

LEAVE A REPLY

*