पारनेरातील लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, खून प्रकरणी तिघांना फाशी

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोणी मावळा (ता. पारनेर) येथे शाळकरी अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार करत खून केला होता. याप्रकरणी दोषी धरत जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी संतोष विष्णू लोणकर (वय 36), मंगेश दत्ता लोणकर (वय 30) व दत्ता शंकर शिंदे (वय 27) तिघे राहणार लोणी मावळा यांना तिहेरी जन्मठेप व फाशीची शिक्षा शुक्रवारी सुनावली. तसेच आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपये दंड, त्यातील एक लाख रुपयांची रक्कम पीडिताच्या पालकांना देण्यात यावी व उर्वरित 50 हजार रुपये शासन जमा करावेत. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा लिलाव करण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.

 

22 ऑगस्ट 2014 रोजी पीडित मुलगी आळकुटी (ता. पारनेर) येथे शाळेत गेली होती. दहावीच्या वर्गात असल्यामुळे पेपरचे दिवस सुरू होते. त्या दिवशी सायंकाळी ती लोणी मावळा येथे चारी रस्त्याने घराकडे जात होती. यावेळी निर्जन स्थळाचा फायदा घेत संतोष लोणकर, मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे या तिघा नराधमांनी तिला अडविण्याचा प्रयत्न केला. माझी वाट सोडा अशी विनंती करुनही तिची छेडछाड करण्यात आली. आरोपींच्या भितीपोटी पीडितेने घर गाठण्याचा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी तिच्यावर हल्ला केला. तिला मारहाण करीत तोंड दाबून, तिघांनी चारीच्या आडोशाला नेले.

 

निर्जनस्थळाचा फायदा घेत तिघांनी पिडीतेवर आळीपाळीने अत्याचार केले. तिने विरोध केला असता, तिला पाण्याच्या दलदलीत पाडून तोंडात चिखल कोबला. तरी देखील जिवाच्या आकांताने तिने तिघांच्या शरिरावर नखाने ओरखड्या ओढल्या. मात्र, आरोपींनी तोंड दाबून तिच्या घशात चिखल कोबला. तिघांच्या रक्षसी कृत्यापुढे ती हतबल झाली.अत्याचारानंतर ही घटना उघड होऊ नये, यासाठी तिच्या डोक्यात स्कु्र-ड्रायव्हरने वार करण्यात आल. अखेरचा श्वास घेईपर्यंत नराधमांनी तिचावर अत्याचार केला. पीडित जिवंत राहू नये यासाठी नराधमांनी तिच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळाहून पसार झाले, असा युक्तीवाद सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. निकम यांनी केला होता.

 

 

दरम्यान, रात्र झाली तरी मुलगी घरी का येईना म्हणून आई वडीलांचा जीव टांगतीला लागला. पालक, नातेवाईक यांनी बॅटर्‍या घेऊन लोणी मावळाचा शिवार पायाखली घातला. रात्री उशिरा चारीच्या कडेला अस्थव्यस्त पडलेले दप्तर एका व्यक्तीच्या नजरेस पडले. त्यानंतर पीडितेचा मृतदेह आढळन आला. या घटनेमुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडली होती. यावेळी तात्कालीन पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अप्पर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस उपअधिक्षक यादवराव पाटील व पारनेर पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या दिवशी मोठा पोलीस फौजफाटा तपासासाठी लावण्यात आला.

 

 

आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश येत नसल्याने जनतेचा आक्रोष वाढला. मात्र, सखोल तपासाअंती पोलीस पीडितेच्या एका मैत्रिणीनीपर्यंत पोहचले. तिने संतोष लोणकर हा तिला त्रास देत होता अशी माहिती दिली. सुताहुन स्वर्ग गाठण्यासाठी स्वत: लखमी गौतम यांनी घटनास्थळी ठाण मांडले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी लोणकरच्या दिनचर्यावर लक्ष ठेवले. तो कोठे बसतो, काय करतो, ही माहिती हाती आल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मित्रास चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, त्याने हे कृत्य केल्याची कबुली त्या मित्राजवळ दिली होती. सबळ पुरावा हाती आल्यानंतर यादवराव पाटील व शरद जांभळे यांच्या पथकाने 23 ऑगस्टला पहिला आरोपी संतोष लोणकर यास बेड्या ठोकल्या.

 

 

त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. पहिल्याच दिवशी त्याच्याकडून कपडे, स्कु्र-ड्रायव्हर यांच्यासह महत्वाच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या. त्यानंतर आरोपी मंगेश व दत्ता यांन26 ऑगस्टला अटक करण्यात आली. त्यांनी देखील पोलिसांना घटनाक्रमाचा उलगडा करुन दाखविला. या तिघांकडून सबळ पुरावे जमा करण्यात आले. साक्षीदार, पंच, वैद्यकीय अहवाल, अधिकार्‍यांचे जबाब असे सक्षम दोषारोपपत्र 18 नोव्हेंबर 2014 रोजी पोलीस निरीक्षक शरद जांबळे यांनी न्यायालयात सादर केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खटल्यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला. सरकार पक्षातर्फे 24 परिस्थितीजन्य पुरावे, 32 साक्षीदारांना तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा न्यायाधीश केवले यांनी तिघांना कटाच्या आरोपाखाली 120 (ब) प्रमाणे जन्मठेप, 376 व 376 (अ) बलात्कार प्रमाणे जन्मठेप, 302 व व 367 प्रमाणे मृत्युदंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

 

 

आता पुढील कार्यवाही काय….?

जिल्हा न्यायालयात फाशीची शिक्षा झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येते. त्यानंतर तेेथे खटला चालविला जातो. जिल्हा पातळीवर दिलेल्या निकालाची शिक्षा ग्राह्य धरुन त्यावर योग्य विचार केला जातो. उच्च न्यायालयात अपील फेटाळले तर, आरोपींना सर्वेच्च न्यायालयात अपील करता येते. त्यांनी सर्वेच्च न्यायालयात अपिल केले नाही, तरी सर्वेच्च न्यायालय या खटल्याची पडताळणी करीत असते. त्यामुळे आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार असल्याची माहिती विधी तज्ञांनी दिली.

 

संवेदनशील खटल्यांचे ऑडीट करणे महत्वाचे
आतापर्यंत मी चालवलेल्या खटल्यांमध्ये 40 जणांना मृत्युदंड तर 655 जणांना जन्मठेप झाली आहे. युकुब मेमन व कसाबला फाशी देण्यात आली आहे. त्यातील पाच जणांची फाशी राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. यातील मुंबई दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट, कोपर्डी, लोणी मावळा यांच्यासह अन्य खटले संवेदनशील असून त्यांनी महत्वाचा अनुभव दिला. त्यांची सुनावणी तात्काळ व्हावी, यासाठी सरकारच्यावतीने प्रयत्न केले जात आहे. मात्र, आरोपींचे वकील शुल्लक मुद्यांवर हायकोर्टत अपील करतात. त्यामुळे अशा खटल्यांच्या सुनावणीला उशीर होतो. या सर्व खटल्यांचे ऑडीट झाले पाहिजे. उशीर करणार्‍यांवर नव्याने कारवाई करण्यासाठी कायद्यात तरतुद करण्याची गरज असल्याची अशी प्रतिक्रीया अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.

 

अशी आहे शिक्षा
कटाच्या आरोपाखाली 120 (ब) प्रमाणे जन्मठेप
376 व 376 (अ) बलात्कार प्रमाणे जन्मठेप
302 व व 367 प्रमाणे मृत्युदंडांची शिक्षा
1 लाख 50 हजार रुपयांचा दंड
दंडातील एक लाख रूपये पिडीतेच्या कुटुंबास

 

 

मुलींमध्ये आत्मविश्वास वाढेल
या खटल्यात पीडितेला न्याय मिळाला तो आमच्या गावाला न्याय मिळाल्यासारखा आहे. या शिक्षेमुळे शाळेत जाणार्‍या प्रत्येक मुलींमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे. तर गुन्हे करणार्‍यांवर मोठी जरब बसणार आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आम्ही नागरिक समाधानी झालो आहोत. आज आमच्या गावाचाच नाही तर न्यायासाठी झटणार्‍या प्रत्येकाचा न्याय आहे.
– विलास शेंडकर (लोणी मावळा सरपंच)

 

कोपर्डी व लोणी मावळा या दोन्ही घटना सामाजिकदृष्टीने संवेदनशील आहेत. लोणी मावळातील पीडितेला न्याय मिळाला आहे.आता प्रतीक्षा कोपर्डीच्या निर्भायाची आहे. येत्या 18 नोव्हेंबरला या खटल्यावर सुनावणी असून यात देखील तीन आरोपी आहेत. त्यामुळे या खटल्याकडे राज्याचे लक्ष आहे.

 

निकालानंतर आई-वडीलांचे आश्रू अनावर
शुक्रवारी अत्याचार शुक्रवारीच फाशी
निकालेचे मराठीत वाचन
क्रमाने उभे करून शिक्षा सुनावली
एक आरोपी रडला, दोघे स्तब्ध
अवघ्या सात मिनीटात फाशी जाहीर
आरोपीच्या वाहनाचा होणार लिलाव
दंडातील 50 हजार सरकार जमा होणार
अ‍ॅड. निकम यांचे अण्णा हजारे यांच्याकडून अभिनंदन
निकम व जांभळे यांचा न्यायालयाबाहेर सत्कारच
पीडितेची आई बोलत असतांना शेकडो डोळे पान्हावले
पोलिसांचा न्यायालयात मोठा बंदोबस्त

 

 

एका पारड्यात दु:ख, तर दुसर्‍यात न्याय
माझी एकुलती एक मुलगी होती. तिच्यावर झालेल्या अत्याचाराने आम्ही खचून गेलो होतो. मात्र, तिला न्याय देण्यासाठी अ‍ॅड. निकम, पोलीस, नागरिक व माध्यमे उभी राहिली. त्यामुळे मी सर्वांची आभारी आहे. आज निकाल एकूण प्रचंड समाधान वाटते. पण एका पारड्यात न्याय तर दुसर्‍या पारड्यात मुलगी गेल्याची दु:ख आहे. हा न्याय माझ्या एकट्या मुलीचा नसून देशातील सर्व मुलींचा आहे, अशी प्रतिक्रीया पीडितेच्या आईने दिली. यावेळी त्यांनी अ‍ॅड. निकम व पीआय जांभळे यांचे दर्शन घेऊन त्यांचे आभार मानले. तेव्हा त्यांना हुंदाके अनावर झाले होते.

 

या अधिकार्‍यांचे अथक परिश्रम
तात्कालीन पोलीस अधिक्षक लखमी गौतम, शैलेश बलकवडे, पोलीस उपअधिक्षक यादवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास होता. दिवसरात्र एक करुन पोलीसांनी आरोपींना अटक करण्यासाठी श्रम घेतले. तसे पुरावे देखील जाम केले. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लक्ष घालून अ‍ॅड. निकम यांची नेमणुक केली होती. त्यामुळे पिडीत मुलीस चांगला न्याय मिळाल्याचे सामाधन आहे.
– शरद जांभळे (पोलीस उपअधिक्षक)
…………

LEAVE A REPLY

*