लाखाचा बनावट मद्यसाठा जप्त

नाशिकच्या दोघांना अटक

0
सटाणा | दि. १४ ता.प्र.- शहरालगत सुकड नाला परिसरातून अवैधरित्या बनावट विदेशी दारूची विक्री करणार्‍या दोन तरूणांना पोलीस उपअधिक्षक शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली असून या युवकांकडून विविध नामांकित कंपन्यांचा सुमारे एक लाख रूपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

उपरोक्त प्रकरणात शरद धोंडीराम काटकर (वय २४, रा. अमृधाम, औंदुबर नगर, शिंदे मळा, हिरावाडी, नाशिक), ऋषिकेश खैरनार (वय २०, रा. अमृतधाम, मातृदर्शन सोसायटी, के.के. वाघ कॉलेजवळ, नाशिक) यांच्यावर सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काल (दि. १३) उशीरा रात्री गस्तीपथकात असलेले पोलीस उपअधिक्षक शशिकांत शिंदे यांच्यासह अंगरक्षक पप्पु अहिरे, वाहनचालक जिभाऊ बागुल आदींनी सुकडनाला परिसरात संशयास्पदरित्या सी.बी.झेड. (एम.एच.१५-सी.डब्ल्यू.-३५२०) या दुचाकीवरून जात असलेल्या तरूणांना अडवून त्यांच्याजवळील खोक्याची तपासणी केली असता त्यात मॅकडॉल कंपनीच्या बनावट विदेशी दारूच्या १४४ बाटल्या असल्याचे निदर्शनास आले.

संबंधितांना पोलीस ठाण्यात पोलीसीखाक्या दाखवताच मोरेनगर, ता. बागलाण येथे एका ठिकाणी दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्याची त्यांनी कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मोरेनगर येथील शेतमजुरांच्या घरावर छापा टाकून मॅकडॉल व रॉयलस्टॅग कंपनीच्या बनावट विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस पथकात हवा. दोधा आहेर, विजय मंडलीक, रविंद्र काटकर, रितेश परदेशी, योगेश गुंजाळ, आर.बी. देवरे, जयवंत साळुंके आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*